चंद्रपूर - राज्य शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 'ब्रेक द चेन' अंतर्गत विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. हा लॉकडाऊन नसून कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत, असं सुरुवातीला सरकारकडून सांगण्यात आलं. तसंच फक्त वीकेण्डला लॉकडाऊन असेल, अशीही माहिती देण्यात आली होती. मात्र सरकारच्या आदेशानंतरही लोकांमध्ये निर्बंधांबाबत संभ्रम निर्माण झाला. हाच संभ्रम दूर करण्यासाठी आणि लोकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे.
4 आणि 5 एप्रिल रोजी राज्य शासनाने निर्बंधांबाबत आदेश काढले आहेत. जी दुकाने, मॉल्स यातील आवश्यक / जीवनावश्यक वस्तू विक्री करीत आहेत ते सुपर मार्केट्स, मॉल्स सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरु राहू शकतील. आवश्यक नसलेल्या वस्तूंचे विभाग बंद राहतील.
ब्रेक द चेनच्या आदेशात म्हटल्याप्रमाणे आवश्यक सेवा सुरु राहतील. कोणताही व्यक्ती योग्य कारणांशिवाय फिरू शकणार नाही. ही कारणे आदेशात नमूद आहेत.
कोविडसंदर्भातील सर्व आरोग्याचे नियम पाळून सुरु राहू शकतील. मात्र नियमांचे पालन होत नाही हे लक्षात आले तर स्थानिक राज्य शासनाची परवानगी घेऊन बाजार बंद करू शकतात. स्थानिक प्रशासनाने यासंदर्भात काटेकोर लक्ष ठेवणे अपेक्षित आहे.
आठवड्याच्या नियमित दिवशी ग्राहक उपहारगृहांतून सकाळी 7 ते रात्री 8 यावेळेत पार्सल घेऊन जाऊ शकतात. या निर्धारित वेळेनंतर तसेच आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत (वीकेंड) ग्राहक पार्सल घेऊ शकणार नाही. मात्र ई कॉमर्समार्फत तसेच उपहारगृहातून होम डिलिव्हरीमार्फत खाद्यपदार्थ मागवता येईल.
चंद्रपूर शहरात सुरू झालेल्या 2 दिवसीय लॉकडाउन च्या पहिल्या दिवशी शहरातील बाजारपेठेत सामसूम पसरली असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त विविध ठिकाणी लावण्यात आला आहे, अत्यावश्यक कामाशिवाय कुणालाही शहरात आत किंवा बाहेर प्रवेश दिल्या जाणार नाही, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती प्रशासनातर्फे केली आहे.
