नागपूर - शाळेत असताना ओळख झाल्यानंतर एकमेकांच्या सोबत जिवन जगण्याचे स्वप्न उराशी बाळगून वयाच्या १७ व्या वर्षीच मुलीने प्रियकरासोबत पलायन केले. मुलगी पळाल्यानंतर तिच्या वडिलाने अपहरण केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे.
अमित राजू बावणे (१९, कोजबी, ता. नागभीड, जि. चंद्रपूर) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. पीडित मुलगी बारावीची विद्यार्थिनी आहे. ती एका नामांकित शाळेत दहावित शिकत होती तर अमित हा बारावीत शिकत होता. दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम झाले.
दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोघांचेही वय कमी असल्यामुळे कुटुंबियांचा विरोध होता.
त्यांच्या विरोधात जाऊन सहा महिन्यांपूर्वी त्या दोघांनी पलायन केले होते. त्यावेळी तिच्या आईवडीलांनी समजूत घालून तिला घरी परत आणले होते. तिच्यावर लक्ष ठेवून अमितपासून दूर केले होते. मात्र, ती पुन्हा अमितच्या संपर्कात आली. दोघांचे प्रेम पुन्हा बहरले. व्हॅलेंटाईनला दोघांनी भेट घेतली आणि पळून जाण्याचा प्लान केला.
२० फेब्रुवारीला दोघांनी घरून पळ काढला. दोघेही सोबत राहायला लागले. ९ एप्रिलला मुलीचा वडीलांना फोन आला आणि प्रकृती बिघडल्याचे सांगितले. त्यामुळे वडीलांनी हुडकेश्वर पोलिस स्टेशन गाठून तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.