चंद्रपूर - वर्ष 2020 ला देशात कोरोना महामारीची सुरुवात झाली होती, अनेक नागरिकांनी यामध्ये आपला जीव गमावला, मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील वर्षीपेक्षा भयावह स्थिती निर्माण झाली आहे.
आज नागरिक शासकीय रुग्णालयात जायला सुद्धा घाबरत आहे, मागील वर्षी माजी नगरसेविका व सामाजिक कार्यकर्ता नाहीद काझी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील मंत्री, आमदार, खासदार यांच्यासाठी स्पर्धा ठेवली होती ज्यामध्ये जिल्ह्यातील जनप्रतिनिधीसाठी 50 हजारांचा पुरस्कार घोषित करण्यात आला होता.
जर मंत्री, खासदार व आमदार यांना कोरोनाची बाधा झाल्यास त्यांनी आपले उपचार जिल्हा सामान्य रुग्णालयात करावे अशी काझी यांनी अट ठेवली होती.
काझी यांच्या स्पर्धेत एकही जनप्रतिनिधी यांनी कोरोना झाल्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय न गाठता खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार केले.
ज्यामध्ये चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांना कोरोना बाधा झाली असता नागपूर मुंबईच्या रुग्णालयात आपला उपचार केला, तसेच माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार किर्तीकुमार भांगडीया हे गृह विलीगिकरणात राहिले. ज्यामुळे काझी यांच्या स्पर्धेतील पुरस्काराच्या रकमेला जिल्ह्यातील जनप्रतिनिधी मुकले.
जिल्ह्याच्या स्थानिक आरोग्य व्यवस्थेवर यांना विश्वास नसेल तर सामान्य नागरिकांसाठी तरी यांनी आरोग्य सुविधा उभ्या करायला हव्या होत्या, आज नागरिकांचे अकारण जीव जात असताना जिल्ह्यातील जनप्रतिनिधी मात्र प्रशासनाला सल्ले देत बसले आहे.
जिल्ह्यात सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल उभारले असते तर आज नागरिकांवर अशी पाळी आली नसती.
लहान गोष्टींसाठी आंदोलन करणारे जनप्रतिनिधी आरोग्य सुविधेसाठी एक होताना कधी दिसणार काय? असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे.
2 महिन्यापासून चंद्रपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांचे थकीत वेतनासाठी डेरा आंदोलन सुरू आहे, मात्र कुणीही उचित पाठपुरावा करून त्यांच्या वेतनाबाबत ठोस निर्णय घेऊ शकले नाही, फक्त आम्ही बैठक घेतली, लवकर कामगारांना वेतन मिळेल असे फोटो वर्तमानपत्र द्वारे प्रकाशित करण्याचं काम सुरू आहे.
आज कोरोना सारख्या भीषण परिस्थिती मध्ये आरोग्य कर्मचारी अपुरे पडत आहे, अश्यावेळी डेरा आंदोलन कर्ते यांच्या मागण्या प्रशासनाने पूर्ण करून त्यांना सेवेत सामावून घ्यायला हवे मात्र तसे होताना दिसत नाही.
रुग्णांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर वेळेवर मिळत नसून जनप्रतिनिधी यासाठी काय करित आहे, हे नागरिकांना दिसतंच आहे.
समाज माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील जनप्रतिनिधीनवर टीकेची झोड उडत आहे, याला जबाबदार स्वतः जिल्ह्यातील जनप्रतिनिधी आहे.
जिल्ह्यातील जनतेला व प्रशासनाला सल्ल्याची नाही तर कृतीची गरज आहे. अश्या भीषण परिस्थिती मध्ये राजकारण न करता नागरिकांच्या आरोग्याबाबत विचार करीत चांगली आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी जनप्रतिनिधी यांनी पुढाकार घ्यायला हवा.
