चंद्रपूर - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना राज्य सरकारने बुधवार पासून संचारबंदीची घोषणा केली असून या संचारबंदीचा फटका वन पर्यटनाला सुद्धा बसला आहे.
राज्यासहित चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा कोरोना ठाण मारून बसलेला आहे, आरोग्य व्यवस्था कोलमडली असून रुग्णांना उपचार सुद्धा मिळत नाही आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव अन्य क्षेत्रात वाढू नये यासाठी वनविभागाने जिल्ह्यातील राष्ट्रीय अभयारण्य ताडोबा 15 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत पूर्णतः बंद करण्याची घोषणा केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी आणि सर्व प्रकारच्या पर्यावरणीय पर्यटनाची सुविधा १५ एप्रिलपासून ३० एप्रिल २०२१ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दरम्यानच्या कालावधीत ज्या पर्यटकांनी माय ताडोबा या वेबसाईटवरून ताडोबा सफारीचे बुकींग केले असेल त्यांना बुकींगसाठी भरलेली पूर्ण रक्कम ऑनलाईन माध्यमातून परत केली जाणार आहे. येत्या सहा महिन्यांच्या कालावधीत ही रक्कम संबंधित पर्यटकांच्या ईवॉलेटमध्ये पाठविली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अशा पर्यटकांसाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने, हेल्पलाईन सुरू करण्यात आली असल्याची माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वन संरक्षक आणि क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून जाहीर केले आहे.