ताजी बातमी - लॉकडाऊन संबंधीची नवी नियमावली बुधवारी (21 एप्रिल) जाहीर करण्यात आली आहे. 22 एप्रिल संध्याकाळी 8 वाजल्यापासून या नियमांची अंमलबजावणी होणार आहे.
सरकारी कार्यालयात 15 टक्के हजेरी, लग्न समारंभात नियमांचा भंग केल्यास 50,000 रुपयांचा दंड, अत्यावश्यक कामासाठीच जिल्ह्याबाहेर जाता येणार असे तीन महत्त्वाचे नियम या लॉकडाऊनमध्ये असणार आहेत.
सामान्य लोकांच्या प्रवासावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आपले ओळखपत्र दाखवूनच तिकीट दिले जाणार आहे.
खासगी वाहतूक करणाऱ्यांना अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास करता येणार नाही. खासगी वाहतूक करणाऱ्यांनी जर नियम मोडले तर 10,000 रुपये दंड लावण्यात येणार आहे.
याआधी जाहीर केलेले नियम पूर्ववत पाळणे बंधनकारक असणार आहे.
ब्रेक द चेन अंतर्गत राज्यातील लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर करण्यात आले आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता लग्न समारंभासाठी फक्त 25 लोकांना परवानगी. एकाच हॉलमध्ये 2 तास कार्यक्रम होऊ शकतो. लग्न समारंभात नियमांचं उल्लंघन केल्यास 50 हजार दंड ठोठावण्यात येईल.
राज्यामध्ये 14 एप्रिलच्या रात्रीपासून लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. एप्रिल महिना संपेपर्यंत हा लॉकडाऊन असेल. या कालावधीसाठीच्या नियमांमध्ये आज सकाळीच काही बदल करण्यात आले.
किराणा मालाची दुकानं, भाज्यांची दुकानं, फळविक्रीकेंद्र, डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी यांच्यासह सर्वप्रकारची अन्नधान्य विक्री केंद्र (यामध्ये चिकन, मटन, पोल्ट्री, अंडी, मासे विक्रेत्यांचा समावेश आहे), शेतमालाशी निगडीत खरेदी-विक्री केंद्र, पाळीव प्राण्यांचे अन्नविक्री केंद्र, पावसाळी हंगामाच्या दृष्टीने आवश्यक वस्तूविक्री केंद्र सकाळी 7 ते 11 या वेळेपुरतीच खुली राहतील.
या दुकानांमधून होम डिलिव्हरी अर्थात घरपोच वस्तू पोहोचवण्याची सुविधा सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहील. परिस्थितीचा अंदाज घेऊन स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये बदल करू शकतं.
आज रात्रीपासून सुधारित नियम लागू होतील. 1 मे पर्यंत नागरिकांना लॉकडाऊन नियमांचं पालन करायचं आहे.