बुलढाणा - मुलं मोबाइलच्या आहारी गेल्याचंही अनेकदा पाहायला मिळतं आहे. अशावेळी मोबाइल मिळाला नाही तर मुलं आरडाओरड करतात, रडतात किंवा रुसून बसतात. पण बुलडाणामधील एका घटनेने सर्वांच्या काळजात चर्रर झालं आहे. अवघ्या 12 वर्षांच्या मुलाने त्याला गेम खेळण्यासाठी मोबाइल मिळाला नाही म्हणून टोकाचं पाऊल उचललं आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या टाकळीपंच येथील शेतकरी दाम्पत्याने कोरोना काळात आपली मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी त्यांना अँड्रॉइड मोबाइल घेऊन दिला. दिवसभर शेतीची काम करून हा मोबाइल त्यांनी मुलांना शिक्षणासाठी घेऊन दिला होता. मात्र हाच मोबाइल त्यांच्या मुलासाठी काळ बनून येईल हे त्यांना उमगलं नाही.
शेतीच्या कामात व्यस्त असल्यामुळे दिलेल्या मोबाइलवर मुलं दिवसभर काय करतात याकडे त्यांचं लक्ष गेलं नाही. घरात दोघे भावंड अभ्यास सोडून मोबाइलवर ऑनलाइन गेम्स खेळत होते. एके दिवशी या भावंडांपैकी शैलेश या 12 वर्षीय मुलाला त्याच्या भावाने मोबाइल न दिल्याने त्याने रागाच्या भरात विष पिऊन आत्महत्या केली. इंगळे कुटुंबीय या घटनेमुळ पुरते हादरून गेले आहेत. परमेश्वर इंगळे आणि नीता इंगळे या आईवडीलांकडे आता शैलेशच्या आठवणींशिवाय काहीच उरलं नाही आहे.
परमेश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ते घरी आल्यानंतर त्यांच्या मुलांमध्ये किरकोळ वाद झाल्याचे त्यांना समजले. त्यातूनच शैलेशने विष घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. शाळा चालू असती तर मोबाइलच आणावा लागला नसता, या मोबाइलमुळेच हे घडलं असल्याची दु:ख या आईबापाने व्यक्त केलं आहे.
