चंद्रपूर - राजुरा येथील भारत चौक निवासी अमोल रत्नमाला दिनकर साईनवार यांना १ लाख रुपये रोख रकमेचा अंत्योदय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी ही राशी अयोध्या राम मंदिर निर्माण कार्यास दान केली.
साईनवार यांनी पूर्वाश्रमीच्या होप आणि आता शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून लावलेला समाज-राष्ट्र कार्याचा वेळू गगनावरी गेला असून यापूर्वी त्यांना चंद्रपूरचे ज्येष्ठ संघ सरसंचालक डॉ. सचिदानंद मुनगंटीवार, दत्तप्रसन्न महादानी, सुहास अलमस्त यांच्या हस्ते चंद्रपूर भूषण हा पुरस्कार सुद्धा देण्यात आला होता. दरम्यान त्यांच्या निवास स्थानीच संपन्न अंत्योदय पुरस्कार वितरण कार्यक्रमाला चंदा गोखले आगाशे, राहुल गोखले, रवी पोखरना, उमेश मोरे, पांचाळ जी, विजय प्रताप सिंग उपस्थित होते.
डी. एच. गोखले न्यास आणि रामभाऊ म्हाळगी प्रभोधिनी च्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार राशी १ लाख रुपये विवेक भागवत यांना सुपूर्द करण्यात आली.
शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट ८ राज्यातील ३७ जिल्ह्यात काम करत आहे. शिक्षण, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि ध्यान ह्या क्षेत्रात शिवप्रभा चा ठसा उमटला असून ५५० पेक्ष्या जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत अनेक डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, आयएएस अधिकारी घडविले आहेत. अनेक विद्यार्थी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडू आहेत. १३ गावात ग्रामीण विकासाचे काम सुरु आहे. २५० ग्रामीण महिलांना रोजगार निर्माण करून देण्यात आला आहे. त्यातल्या ९०% महिला शेतकरी आत्महत्या ग्रस्तांच्या विधवा आहेत. १०० शेतकऱ्यांचा शिवप्रभा शेतकरी समूह कार्यरत आहेत. २५० पेक्ष्या अधिक शेतकरी कुटुंबातील मुलींचे लग्न करण्यात आले आहे. त्यासोबत शिवप्रभा आरोग्य आणि ध्यान साधना ह्या क्षेत्रात पण काम करत असल्याची माहिती विश्वस्त शिशिर मांड्या यांनी दिली आहे.
