भद्रावती - आयुध निर्माणी वसाहतीमधील कनिष्ठ विद्यालयात कार्यरत असणारे मुख्याध्यापक रंगा राजू यांची आयुध निर्माणी प्रबंधनाने तडकाफडकी बदली केल्याने पालक व विद्यार्थी वर्ग प्रबंधनावर चांगलेच नाराज झाले असून आज शाळेसमोर विद्यार्थी व पालकांनी धरणे आंदोलन केले.
विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ, शिस्त व शाळेच्या निकलासाठी धडपड करणारे मुख्याध्यापक रंगा राजू यांच्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले.
स्थानिक कनिष्ठ विद्यालयातील शिक्षकांचे खाजगी शिकवणी वर्ग बंद करून स्वतः मुख्याध्यापक रंगा राजू यांनी विद्यार्थ्यांचे एक्स्ट्रा क्लास निशुल्क घेतले.
कोरोना काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवले मात्र खाजगी शिकवण्या बंद झाल्याने शिक्षक मुख्याध्यापक राजू यांचेवर नाराज झाले होते, त्यांचेवर अनेक उलटसुलट आरोप करण्यात आले, प्रबंधनाला तक्रारी करण्यात आल्या होत्या.
प्रबंधनाने सुद्धा त्यांची तडकाफडकी बदली केली मात्र त्यांच्या जाण्याने विद्यार्थी त्यांच्या शिस्तबद्ध शिक्षणाला मुकणार यासाठी विद्यार्थी व पालकवर्ग रस्त्यावर उतरले असून त्यांची बदली रद्द करण्यात यावी अशी मागणी करीत आहे.