गडचिरोली - इंटरनेटचं कमी सिग्नल आणि अचानक आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे गोंडवाना विद्यापीठाची मोबाइलवर ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांची चांगली दमछाक झाली. काहींनी गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर जाऊन तर काहींनी नेटवर्कच्या शोधात थेट छत्तीसगढ सीमेपर्यंत धाव घेत पेपर सोडवण्याचा प्रयत्न केला. काही विद्यार्थ्यांना तर नेटवर्क उपलब्ध न झाल्याने पेपर सोडवण्यापासून वंचित राहावे लागले. तर काहींनी जंगलात बसून पेपर सोडवला.
गोंडवाना विद्यापीठाच्या बी.एस्सी आणि बी.ए. या पदवी अभ्यासक्रमाची सध्या ऑनलाइन परीक्षा सुरू आहे.
पण कोरचीत दोन दिवसांपासून मोबाइल नेटवर्कच नव्हते. त्यामुळे सोमवारी पेपर सोडविण्यासाठी नेटवर्क मिळवताना विद्यार्थ्यांना रानावनात भटकंती करावी लागली.
नेटवर्कचा शोध घेत विद्यार्थी भटकताना दिसले. काहींनी 25 ते 30 किमी अंतरावरील गोंदिया जिल्ह्यातील चिंचगड, तर काहींनी छत्तीसगड सीमेवरील गावाजवळ जाऊन पेपर सोडविण्याचा प्रयत्न केला.
ऑनलाईन पेपर सोडवताना काही अडचण आल्यास संबंधित विद्यार्थ्यांनी प्राचार्यांमार्फत विद्यापीठाला कळवावं. त्यांचा पेपर पुन्हा घेण्याची व्यवस्था करण्यात येईल, अशी भूमिका विद्यापीठाने घेतली आहे. तसंच परिपत्रकच विद्यापीठाने काढलं आहे. तांत्रिक कारणाने विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, असंही विद्यापीठाने स्पष्ट केलं आहे.
राज्यात लॉकडाउन चे सावट व विद्यार्थी आपल्या गावी आल्याने विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा सुरू असताना मोबाईल नेटवर्क कव्हरेज चा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना होत असल्याने त्यांना कव्हरेज साठी थेट गोंदिया, छत्तीसगड सीमेवर जाऊन कव्हरेज साठी भटकंती करावी लागत आहे.

