चंद्रपूर - DNR ट्रॅव्हल्स मध्ये 20 वर्षीय तरुणीचा विनयभंग प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेने दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांची भेट घेत घटनेचे गांभीर्य त्यांना सांगत निवेदन दिले.
नियमबाह्य पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती, त्यांचा पोलीस रेकॉर्ड याची पूर्तता DNR ट्रॅव्हल्सच्या संचालकाकडून खरंच होत आहे का, याची पडताळणी व्हावी.
आज विनयभंग झाला उद्या अत्याचार होणार, त्या तरुणीने तक्रार करीत आपली हिंमत दाखवली मात्र काही पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रार टाळण्याचा प्रयत्न केला, अशी चूक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांकडून होता कामा नये, असे झाल्यास पीडित महिला समोर येणार का? असा प्रश्न मनसे महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड यांनी उपस्थित केला.
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तात्काळ या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित तपास अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले.
विशेष म्हणजे या गंभीर प्रकरणाची फक्त महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेने दखल घेतली, राज्यात कुठेही अश्या घटना घडल्यावर चंद्रपूर जिल्ह्यात त्याचे पडसाद बघायला मिळतात मात्र इतर महिला संघटना यावर गप्प आहे.
मनसे नंतर आज आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रामनगर पोलीस स्टेशन गाठत, पोलीस निरीक्षक रोशन यादव यांची भेट घेत आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. पुन्हा अश्या घटना घडायला नको याची काळजी पोलीस प्रशासनाने घ्यायला हवी.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, शहर संघटक मनोज तांबेकर, महिला जिल्हा सचिव अर्चना आमटे, शहर उपाध्यक्ष वाणी सादलावार, वर्षा भोमले, तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, सुयोग धनवलकर आदी उपस्थित होते.