चंद्रपूर - शहरातील दुर्गापूर व रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चैन स्नेचिंग व मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणात रामनगर पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेत 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहरात चैन स्नेचिंग च्या घटना काही दिवसांपूर्वी घडल्या होत्या, भरदिवसा या घटना घडल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते मात्र पोलिसांच्या सतर्कतेने ह्या घटनेतील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात रामनगर पोलिसांना यश आले.
चैन स्नेचिंग व लखमापूर येथील दानपेटी चोरी प्रकरणात मेजर गेट, तुकूम निवासी 19 वर्षीय रूप उर्फ अबीर सोमदत्त, पडोली येथील 21 वर्षीय यश रवींद्र फुलझेले, बंगाली कॅम्प येथील 19 वर्षीय विकास दशरथ भोयरवार, सोमनाथ, मूल निवासी 20 वर्षीय चिराग जयंत आत्राम, गोंडसावरी, मूल येथे राहणारे 19 वर्षीय वैभव रामदास गाडगे आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आरोपिकडून 12 ग्राम सोन्याची चैन किंमत 60 हजार रुपये, 10 ग्राम मंगळसूत्र किंमत 30 हजार, सदर गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल किंमत 30 हजार, मोपेड वाहन 40 हजार रुपये व रोख रक्कम 1 हजार 440 रुपये असा एकूण 2 लाख 1 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपविभागीय अधिकारी शिलवंत नांदेडकर व रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मलिक, एकरे, पोलीस कर्मचारी रजनीकांत, प्रशांत, संजय, किशोर यांनी यशस्वीपणे पार पाडली.
