वणी - कापूस चुकऱ्याचे 45 लाख रुपये रोख रक्कम बँकेतून आणत असताना काही जणांनी जिनिग सुपरवायझरला मारहाण करीत पैसे लुटल्याची घटना उघडकीस आली आहे.
निळापूर ब्राह्मणी मार्गावर इंदिरा एक्जीम प्रायव्हेट लिमिटेड नावाची जिनिंग फॅक्टरी आहे, या फॅक्टरीचे मालक आनंद अग्रवाल असून कम्पनीचे संचालक म्हणून अनिल व देवेंद्र अग्रवाल हे काम बघतात.
मागील 10 वर्षापासून या कंपनीत 47 वर्षीय मनीष जगजीवन जंगले हे सुपरवायझर पदावर काम करतात, शनिवारी दुपारच्या सुमारास ते आपल्या दुचाकीने बँक ऑफ इंडियात गेले व तिथे 45 लाखांचा धनादेश वटवीत रोख रक्कम बॅग मध्ये भरली.
ते पैसे बॅग मध्ये टाकून जिनिंग मध्ये जाण्यासाठी निघाले असता 3 वाजताच्या सुमारास अहफाज कॉटन जिनिंग जवळ एका कार ने त्यांना धडक दिली, अचानक दिलेल्या धडकेत मनीष खाली पडले असता कार मधून दोघांनी उतरत मनीष यांना मारहाण करीत पैश्याची बॅग हिसकावली व ते दोघे कार मधून पळून गेले.
मनीष यांनी याबाबत जिनिंग संचालकांना कळविले व पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, वणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात 394 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैभव जाधव करीत आहे.