मुंबई: कांग्रेस प्रदेशाध्यक्ष बरोबर ठाकरे सरकारच्या खातेवाटपातही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेने विधानसभा अध्यक्षपद स्वत:कडे ठेवून काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. तसेच उपमुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली असून काँग्रेसमध्ये कुणाच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ पडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. #News34Chandrapur
काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचं नाव निश्चित केलं आहे. पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच मंत्रिपदाचीही मागणी केल्याने काँग्रेस समोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेऊन पटोले यांना मंत्रिपद देणं शक्य नव्हतं. त्यामुळे पटोलेंकडील विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला देऊन त्या बदल्यात उपमुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेण्याचा तोडगा समोर आला. त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपदाची ऑफर देऊन उपमुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. शिवसेनेनेही त्याला मान्यता दिली असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून काँग्रेसमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेले मंत्री म्हणून विजय वडेट्टीवार यांच्याकडे पाहिले जाते. वडेट्टीवार हे ओबीसी नेते आहेत. आक्रमक आहेत. तसेच स्पष्टवक्ते आहेत. शिवाय विदर्भातून आलेले आहेत. राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा असा वाद सुरू आहे. त्यातच ओबीसी जनगणनेची मागणी राष्ट्रीय पातळीवर होत आहे. या मागणीने जोर धरल्यास आगामी काळात ओबीसींची शक्ती एकवटण्याची शक्यता आहे. अशा वेळी या ओबीसी मतदारांना काँग्रेसकडे वळवण्यासाठी वडेट्टीवार यांचा पक्षाला मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे ओबीसींना आपल्याकडे वळवण्यासाठी वडेट्टीवार यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन बळ देण्याचं काँग्रेसमध्ये घटत आहे. त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद दिल्यास भाजपकडे वाढणारा ओबीसींचा ओघ रोखणं शक्य होणार आहे. त्यासाठीही वडेट्टीवार हे उपमुख्यमंत्रीपदासाठी पक्षनेत्यांची पसंती असल्याचं राजकीय सूत्रांनी सांगितलं.