गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यात गेल्या पाच महिन्यांपूर्वी अचानकपणे आलेल्या चक्री वादळासह पावसाने कहर माजवले होते. यात तालुक्यातील इतर ठिकाणांसह नांदा येथील अनेक घरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते.सोबतच शेतशिवरातील आठ ते दहा विद्युत खांब कोसळल्याने शेतकऱ्यांच्या कृषी पांपाचा वीज पुरवठा खंडीत झाला.मात्र पुरवठा सुरळीत करण्यात आला नसल्याने रब्बी पिकांचे मोठे नुकसान होत आहे.पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून वीज वितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आर्थिक फटका बसत असल्याचे मत व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांनी अनेकदा गडचांदूर वीज वितरण कार्यालयात निवेदन देऊन विद्युत खांब उभे करून वीज जोडणी करून देण्याची मागणी केल्याचे कळते.मात्र संबंधित विभाग याकडे गांभीर्याने घेताना दिसत नाही.यामुळे यांदा रब्बी हंगाम हातातून गेल्याची बोंब सुरू असून शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली आहे. एकीकडे अस्मानी संकटात सापडलेल्या बळीराजाला आता सुलतानी संकटाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा काम महावितरणाकडून होत असल्याचे आरोप होत आहे.
----------//---------
मी कांदा,हळद,चना,गहू हे रब्बी पिक दरवर्षी घेत होतो.मात्र वादळामुळे खांब कोसळले आणि वीज पुरवठा खंडित झाला.विद्युत कार्यालयात अनेकदा निवेदने दिली मात्र त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने यावर्षी रब्बी पिकांचा पेराच केला नाही.
किसन चौधरी
(शेतकरी नांदा)
------//------
वीज पुरवठा खंडित आहे हे माहित असताना देखील यावर्षी आम्हाला उत्पन्न होऊन फायदा होईल ही आशा न करता घरी खायला होईल, विकत घ्यावे लागणार नाही अशी अपेक्षा ठेवून गहू पेरलं मात्र दुसऱ्या डीपीवरून शेतकऱ्यांकडून पाणी विकत घ्यावे लागत आहे.
चांगदेव बोडखे
(शेतकरी नांदा)
------//------
दरवर्षी या हंगामात गहु,चना या रब्बी पिकाने शेत हिरवेगार दिसायचं,मात्र मागील चक्रीवादळात विद्युत खांब कोसळले आणि आमच्या कपाशीचे पण ओलीत झाले नाही.यामुळे यंदा गहू आणि हरभऱ्याच्या पेरा केलाच नाही.आता आम्हालाच गहू विकत घ्यावे लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
वामन पेंदोर
(शेतकरी नांदा)
