ब्रह्मपुरी - रंगनाथ स्वामी पतसंस्था वणी शाखा ब्रह्मपुरी येथे 5 लाख 25 हजार 140 रुपयांची चोरी झाल्याची तक्रार 11 फेब्रुवारीला ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये प्राप्त झाली.
11 फेब्रुवारीला बँक मॅनेजर आनंद वसाके यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली की सकाळी 9.30 वाजता बँकेतील शिपाई राजू गराडे यांनी फोन करून माहिती दिली की बँकेत सीसीटीव्ही मॉनिटर, केबल व कॅश ठेवलेला ड्रॉप हा उघडा असून त्या मधील कॅश गायब आहे, त्यानंतर वसाके हे तात्काळ बँकेत पोहचले असता 10 फेब्रुवारीला झालेल्या ऑडिट मधील 5 लाख 25 हजार 140 रुपयांची रक्कम गहाळ झाली असल्याचे निदर्शनास आले.
या घटनेची तक्रार वसाके यांनी ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये केली.
ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे डीबी पथक बँकेत पोहचून पंचनामा करीत असता त्यांनी बँकेतीलचं काही कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली, त्यानंतर शिपाई गराडे यांच्या घरी डीबी पथकाने चौकशी केली असता त्यांच्या घरी चोरी गेलेली रक्कम 5 लाख 25 हजार 140 रुपये व गुन्ह्यात वापरलेली लोखंडी सळाख पोलिसांनी जप्त केली.
शिपाई गराडे यांनी मोठ्या शिताफीने बँकेतील शटर उघडत सीसीटीव्ही बंद करीत बँकेतील रक्कम चोरी केली व कुणाला संशय जाऊ नये यासाठी तो मी नव्हेचं अशी भूमिका घेतली.
मात्र ब्रह्मपुरी पोलिसांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीचा वापर करीत हा गुन्हा अवघ्या 6 तासात उघडकीस आणला. #News34Chandrapur
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे, स्वाती फुलेकर, अरुण पिसे, डीबी पथकातील अमोल गिरडकर, योगेश शिवणकर, संदेश देवगडे, अजय कटाईत, मुकेश गजबे, विजय मैंद, शुभांगी शेमले यांनी यशस्वी केली.
