पुणे - चार दिवसांपूर्वी (7 फेब्रुवारी) पुण्यात एका तरुणीनं आत्महत्या केली आहे. पूजा चव्हाण असं तरुणीचं नाव असून ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत रहात होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर ह्या आत्महत्येशी विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली आहे. आता तर त्यासाठी भाजपनं रितसर तक्रार दाखल केली आहे.
मुळची परळीची असलेली 22 वर्षाची पुजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री 1 च्या आसपास तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पुजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.
भाजपकडून आता रितसर तक्रार पुजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणी भाजपच्या महिला नेत्या आणि आघाडी आता आक्रमक झाली आहे. पुजाच्या आत्महत्येला कारण ठरलेल्याची चौकशी करावी अशी मागणी वानवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तसं रितसर निवेदनही देण्यात आलं आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनाही चौकशीची मागणी करणारं निवेदन भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष अर्चना पाटील यांनी दिलं आहे.
पुजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधीत काही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. त्या त्याच प्रकरणाशी संबंधीत आहेत का याचाही खुलासा किंवा माहिती ना पोलीसांनी दिली आहे ना, पुजाच्या कुटुंबियांनी. पण त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सुचना देत असल्याचं समजतं. हे संपूर्ण प्रकरण आता तापत चाललं असून, पुणे पोलीसांनी सविस्तर खुलासा करण्याची मागणीही सोशल मीडियात होती आहे.
