ताजी बातमी नागपूर - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना समन्वयकांनी सोमवारी बैठक बोलावली होती. या बैठकीला शहरातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेना या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनातील खदखद जाहीरपणे मांडली. पक्षासाठी कित्येक वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना डावलून प्रमुख पदं दिल्याचा आरोप यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यांनतर शहरातील अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनी ‘काँग्रेसी भगाव’च्या घोषणा देत राजीनामे दिले. दुष्यंत चतुर्वेदी काँग्रेसमधून शिवसेनेत आले. त्यानंतर चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेतला. नागपुरात आधी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पेटली होती. मात्र आता शिवसेनेतच अंतर्गत दुफळी समोर आली आहे.नागपूर शहरात बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन गटांनी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यासोबतच नाराज शिवसैनिकांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिलं आहे. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर शिवसेनेतील गटबाजी उघड झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.नागपूर शहरातील तीन माजी जिल्हाप्रमुखांच्या सहीचं पत्र उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आलं आहे. शेखर सावरबांधे, सतीश हरडे, बंडू तागडे यांचे गट आक्रमक झाले आहेत. सध्याचे नागपूर शहर संपर्कप्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांच्यावर निष्ठावंत शिवसैनिकांची नाराजी आहे. त्यामुळे नागपुरात दुसरा संपर्कप्रमुख देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
नागपूर महानगरपालिका निवडणूकीपूर्वी मुंबईतील नेत्यांनी समन्वय करावं, अशी मागणीही पत्रातून करण्यात आली आहे. 26 जानेवारीला नाराज शिवसैनिक उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आपली व्यथा मांडणार आहेत.
