चंद्रपूर - उपेक्षित, वंचितांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करण्यासाठी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या साथीने स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणा-या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर स्त्री शिक्षणासाठी संघर्ष केला. त्या संघर्षाची, जिद्दीची प्रेरणा घेवून महिलांनी समाजात सक्रीयपणे काम करावे असे आवाहन चंद्रपूरच्या माजी महापौर तथा चंद्रपूर महानगर जिल्हा भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. अंजली घोटेकर यांनी केले.
दिनांक 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनानिमीत्त चंद्रपूरातील दे.गो. तुकूम प्रभाग क्र. 1 मध्ये आयोजित कार्यक्रमात सौ. अंजली घोटेकर बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमात ह.भ.प. निर्मला लेनगुरे, श्रीमती उषा सास्तीकर, श्रीमती रूखासाना बानो या महिलांचा तसेच आदर्श सुनबाई म्हणून सौ. मोनाली कोसे, सौ. कविता राऊत यांचा सत्कार करण्यात आला. मानीनी बहुद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा सौ. चैताली नवले आणि चमू तसेच रेणुका महिला भजन मंडळ अध्यक्षा श्रीमती सुमन पुप्पलवार आणि चमू यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या वेशभूषेत गौरव कोसे आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत कु. शर्वरी महल्ले ही बालके होती. त्यांचेही यावेळी कौतुक करण्यात आले.
स्त्रीयांनी आज सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली असून असे एकही क्षेत्र उरले नाही जिथे स्त्रीयांनी आपले कर्तृत्व सिध्द केले नाही. सावित्रीबाईंनी आपले अवघे आयुष्य स्त्रीयांना शिक्षीत करण्यासाठी, अस्पृश्यता निवारणासाठी, विधवा विवाह आदींसाठी खर्ची घातले. त्यांनी घालुन दिलेला आदर्श व त्यांची शिकवण अंगीकारणे हीच सावित्रीबाईंना आदरांजली ठरेल, असे सौ. अंजली घोटेकर यावेळी बोलताना म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनपा सदस्या सौ. शिला चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाला प्रभागातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
