ताजी बातमी - कोरोना काळात नागरिकांना आलेल्या वीज बिलांचा मोठ्या प्रमाणात शॉक लागला होता मात्र कुणाचाही वीज पुरवठा व सक्तीने बिल वसुली न करण्याचे ऊर्जा विभागाने निर्णय घेतला होता मात्र आता ऊर्जा विभागाची आर्थिक परिस्थिती अधिक बिकट झाल्याने वीज बिल थकबाकीदार यांना वीजबिल भरणा करण्याच्या सूचना करा अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयाला दिले आहे.
डिसेंबर 2020 अखेर राज्यात एकूण 63 हजार 740 कोटी रुपयांची थकबाकी असून यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणसमोर कोणताच पर्याय उरलेला नाही.
डिसेंबर अखेर राज्यातील कृषिपंप ग्राहकांकडे 45 हजार 498 कोटी रुपयांची थकबाकी आहे तर वाणिज्यिक, घरगुती व औदयोगिक ग्राहकांकडे 8485 कोटी रुपये व उच्चदाब ग्राहकांकडे 2435 कोटी रुपयांची थकबाकी आहे. राज्यात मार्च 2020 मध्ये कोविड 19 मुळे लॉकडाऊनच्या काळात थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित न करण्याचा महावितरणने निर्णय घेतला होता व राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबर अखेरपर्यत खंडित न करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.
आता थकबाकीचा डोंगर वाढल्याने दैनंदिन कामकाज चालविणे महावितरणला शक्य होत नसल्याने, बँकांची व इतर देणी व कर्मचाऱ्यांचा पगार देणेही अशक्य झाले आहे. कोरोना काळात वाढीव वीज बिलांवर सर्व पक्षांनी आंदोलने केली, भाजप , आम आदमी पक्ष व मनसे ने यावेळी सरकारचे लक्ष सुद्धा वेधले होते मात्र नेत्यांचे आश्वासन म्हणजे फुसका बार व महावितरणचा आर या पार प्रहार अशी परिस्थिती बघायला मिळत आहे. MSEDCL-Power-Cut-To-Recover-Bills
ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणला वीज खरेदीसाठी पुरवठादारांना रोजच पैसे द्यावे लागतात. प्रचंड वाढलेल्या थकबाकीमुळे आता यापुढे थकबाकी वसूल करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना जानेवारीपासून मोहिमा राबविण्याचे निर्देश महावितरणने दिले असून थकबाकी वसुलीत कसूर करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईचे संकेतही दिले आहे. तेव्हा थकबाकीदार ग्राहकांनी आपल्या वीज बिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
