चंद्रपूर - कोरोनासारख्या महामारीतून जग सध्या सावरत असताना आता बर्ड फ्लूचे संकट सामोरे आल्याने पुन्हा या रोगाचा धसका नागरिकांनी घेतला आहे.
परभणी जिल्ह्यात तब्बल 1 हजार कोंबड्या मृतावस्थेत मिळाल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली, मृत कोंबड्यांचे नमुने तपासले असता त्यामध्ये काही कोंबड्या या बर्ड फ्लूने संक्रमित आढळल्या. (Bird flu effect reduced the crowd at the Chicken Center in Chandrapur)
सतर्कता म्हणून प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजना म्हणून पोल्ट्री फॉर्म व्यवसायिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केला आहे.
ज्यामध्ये अचानक मोठ्या प्रमाणावर पक्षी मृत होताना आढळल्याची त्याची त्वरित माहिती पशूसंवर्धन कार्यालयाला द्यावी, शेतकरी आणि पशूपालकांना बर्ड फ्लूबाबत सविस्तर माहिती द्यावी, पशूवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रोजच्या किंवा आठवडी बाजारात विशेष सर्व्हेक्षण मोहिम राबवावी, बर्ड फ्लू संशयीत क्षेत्रातून पक्षांची ने-आण पूर्णपणे बंद करावी.
प्रत्येक ग्रामपंचायतीनं धुण्याचा सोडा (Na2Co2 सोडियम कार्बोनेट) यांचं 1 लीटर पाण्यात 7 ग्रॅम मिश्रण करावं. आणि हे मिश्रण कोंबड्यांचं खुराडं, गुरांचे गोठे, गावातील गटारे, नाल्या वा पशूपक्षांचा जास्त वावर असणाऱ्या ठिकाणी फवारावे. दर 15 दिवसात 3 वेळे हे फवारणे गरजेचे आहे. जिल्हास्तरावर दक्षता कक्षाची स्थापना करावी आणि त्यांना बर्ड फ्लूबाबत आवश्यक ते प्रशिक्षण द्यावे.
या संक्रमनापासून नागरिकांना स्वतःला वाचवायचे असेल तर चिकन किंवा अंडी चांगले शिजलेली असणं अत्यंत गरजेचं आहे. 70 ते 100 अंश सेल्सिअसवर चिकन शिजवल्याशिवाय खाऊ नका, कच्चे मांस वा अंडी खाण्याची चूक करु नका, त्यामुळं तुम्हाला बर्ड फ्लूचं संक्रमण होऊ शकते. अंडी वा चिकन खरेदी करताना तोंडाला मास्क असू द्या, चिकन स्वच्छ करताना हॅण्डग्लव्ह्ज वापरल्यास अतिउत्तम, हॉटेलमधील वा अन्य ठिकाणी चिकन वा अंडी खाणं शक्यतो टाळा.
यावर राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी म्हटले की राज्याने 2006 मध्येही बर्ड फ्ल्यूचं संकट पाहिलं होतं. त्यावेळीही राज्य सरकारने पोल्ट्री व्यावसायिकांना मदत केली होती. पोल्ट्री व्यवसायावर ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून आहे. ही अर्थ व्यवस्था डबघाईला जाऊ देणार नाही. पोल्ट्री व्यावसायिकांना वाऱ्यावर सोडणार नाही. केंद्राची वाट न पाहता पोल्ट्री उद्योगाला हात देण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
राज्यात बर्ड फ्लूचे संकट बघता चंद्रपुरातील नागरिकांनी याचा धसका घेत चिकन सेंटर वर नागरिकांची गर्दी कमी झाली आहे.
