नागपूर - सुरक्षा रक्षकांचे वेतन काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वस्त्रोद्योग विभागातील सहाय्यक आयुक्ताला बुधवारी अटक केली. योगेश बाकरे (वय ४४ रा. नंदनवन),असे अटकेतील सहाय्यक आयुक्ताचे नाव आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे वस्त्रोद्योग विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. Nagpur Acb Raid
नागपुरातील सहकारी सूतगिरणी येथे तक्रारदार संचालकाचे आठ सुरक्षा रक्षक तैनात आहेत. त्यांचे ऑक्टोबर २०१५ ते मार्च २०१९ या कालावधीतील ३४ लाख ५५ हजार ९४४ रुपये तसेच डिसेंबर २०१९ ते ऑगस्ट २०२० यादरम्यानचे नऊ लाख ४६ हजार ८३२ रुपये वेतन थकीत होते. थकीत वेतनाचे बिल काढण्यासाठी संचालकाने सिव्हिल लाइन्समधील वस्त्रोद्योग आयुक्तांच्या कार्यालयात अर्ज केला. हे बिल काढण्यासाठी तक्रारदाराने आयुक्तांचे स्वीय सहाय्यक नितीन वर्मा यांची भेट घेतली. वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी वर्मा यांनी संचालकाकडे सात लाख रुपयांची लाच मागितली. एवढी रक्कम देण्यास संचालकाने असमर्थता दर्शविली. पाच लाख रुपये दिल्याशिवाय वेतनाचे बिल काढणार नाही, असे वर्मा यांनी संचालकाला सांगितले. याबाबत संचालकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार, मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भावना धुमाळे यांनी तक्रारीची पडताळणी केली. त्यात वर्मा यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. १२ नोव्हेंबर २०२० ला एसीबीने वर्मा यांना अटक केली. वर्मा यांच्या चौकशीददरम्यान तीन लाख रुपये बाकरे यांना देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले. तक्रारदार व वर्मा यांच्या संभाषणातही बाकरे यांचा उल्लेख झाला. त्यानुसार सोमवारी एसीबीने लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून बाकरे यांना अटक केली. बाकरे यांना २७ जानेवारीपर्यंत एसीबी कोठडी देण्यात आली आहे.
