गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू केल्यानंतर "कहीं खुशी,कहीं गम" अशी परिस्थिती पहायला मिळत आहे.दारूविक्री, दारूचे सेवन तसेच जवळ बाळगण्यावर बंदी आहे.परंतु ही बंदी केवळ नावापुरतीच असल्याची बोंब सुरू असून आजही जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पाहिजे तेवढी देशी,विदेशी दारू अगदी सहजपणे उपलब्ध होत आहे.याच पार्श्वभूमीवर कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगर गडचांदूर शहरात तर वेगळीच परिस्थिती पहायला मिळत आहे.याठिकाणी मागील कित्येक महिन्यांपासन चक्क पोलिस स्टेशनच्या समोरच राजरोसपणे दारूविक्री होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.शहरात सुरू असलेल्या विविध अवैध धंद्यांना पाहून "हे देवा, कुठे नेवून ठेवलंय गडचांदूर माझा" अशी संतप्त भावना सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.शहरात पोलिस प्रशासन अस्तित्वात आहे की नाही अशी शंका निर्माण झाली असून याठिकाणी पोलिसांनी इतरांपेक्षा अवैध धंदे करणाऱ्यांसोबत कमालीचे प्रेम संबंध स्थापीत केल्याने "शाहू धुऱ्यावर,चोर माऱ्यावर" असल्याचे चित्र आहे.
येथील पोलिस स्टेशन समोरील चाय टपरीवर तसेच जिल्हापरिषदेचे माजी सदस्य विलास धांडे यांच्या कार्यालयाच्या बाजूस असलेल्या सुदर्शन नामक व्यक्ती राहत्या घरातून दारूविक्री करीत असून यासाठी त्याने काही तरुणांना रोजंदारीवर ठेवल्याची माहिती आहे. याच्या घराला लागून एका वसाहतीत घरमालक व दोन भाडेकरू कुटुंबासह राहतात. बरेचदा दारूसाठी येणाऱ्या नवीन ग्राहकांना नेमके ठिकाण माहित नसल्याने ही मंडळी सरळ यांच्या घराचा रस्ता धरत असल्याची माहिती आहे.दारूविक्रीमुळे आजूबाजूचे दुकानदार सुद्धा वैतागल्याचे दिसत असून अखेर कितीदा सांगायचं,परिस्थितीत बदलच होत नाही,येथील दारूविक्री निव्वळ डोक्याला ताप बनल्याची जळजळीत भावना काहींनी सदर प्रतिनिधीपूढे व्यक्त केली आहे.यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे काही पोलिस कर्मचारीच पोलिस स्टेशन समोरील चाय टपरी चालकाला पकडलेली दारू आणून देत असल्याची खमंग चर्चा सुरू आहे.यासंबंधी जर व्यवस्थितरित्या चौकशी केल्यास "खरे काय आणि खोटे काय" याचा उलगडा होवून चर्चेला पूर्णविराम मिळेल असे बोलले जात आहे.याचप्रमाणे पोलिस स्टेशनवरून हाकेच्या अंतरावर असलेला एक पान टपरी चालक चक्क बार प्रमाणेच आवश्यक सुविधांसह ग्राहकांना दारू उपलब्ध करून देत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.याला आता कुणाचे आशिर्वाद म्हणावे ! हा मात्र संशोधनाचा विषय ठरत आहे. याठिकाणी होत असलेल्या दारूविक्री बद्दल सर्वसामान्यांना माहिती आहे तर पोलिसांना नसेल का ? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.
एकुणच गडचांदूर पोलिस स्टेशनपुढे व हाकेच्या अंतरावर सर्रासपणे दारूविक्री सुरू असून याविषयी येथील काही सुज्ञ नागरिक एका मोठ्या नेत्याचा नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणारे पोलिस महानिरीक्षकांची भेट घेऊन समस्त माहिती निवेदनातून देणार असल्याचे कळते.विशेष म्हणजे प्रत्येक ठाणेदारावर आपापल्या क्षेत्रातील अवैध धंद्यावर अंकुश लावण्याची जबाबदारी असते परंतु याठिकाणी काहीसा वेगळाच प्रकार घडत आहे.सध्याच्या परिस्थितीत अख्खे गडचांदूर शहर नाना प्रकारच्या नवनवीन अवैध धंद्यांनी माखल्याचे चित्र असून वातावरण अक्षरशः गढूळ झाले आहे.शहरात घडत असलेल्या घटनांकडे लक्ष वेधले तर आता याठिकाणी गैंगवार सुरू होते की काय ? अशी भीती नागरिकांत निर्माण झाली आहे. यासर्व घडामोडीत स्थानिक ठाणेदाराची भूमिका संशयाच्या भोवर्यात सापडली असून गडचांदूरला लाभलेले कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक यांनी याकडे जातीने लक्ष देऊन याप्रकारावर अंकुश लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
