चंद्रपूर : शिवसैनिक हीच शिवसेनेची खरी ताकद आहे. शिवसैनिकांच्या बळावर अनेकांनी निवडणुकांत विजय मिळविला. पदे मिळविली. मात्र, नंतर आपल्या सोयीनुसार सेनेला दगा दिला. परंतु, सेनेला दगा देणा-यांचे पुढे काय झाले, याची सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी किती आले आणि किती गेले याची पर्वा न करता काम करत राहावे, असे आवाहन नगरविकासमंत्री तथा शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांनी केले.
शिवसेनेच्या वतीने रविवारी (ता. २०) येथील राजीव गांधी सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत दादा कदम, जिल्हाप्रमुख संदीप गि-हे, जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, माजी जिल्हाप्रमुख अजय स्वामी, दिलीप कपूर, माजी उपजिल्हाप्रमुख अजय वैरागडे, सिक्की यादव, उपजिल्हाप्रमुख व नगरसेवक धनंजय छाजेड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संदीप करपे, शहराध्यक्ष प्रमोद पाटील, संतोष नरुले, नितीन येरोजवार, बबन उरकुडे, प्रकाश पाठक, नीलेश बेलखेडे, हर्षल शिंदे, राजू ढोहे यांची उपस्थिती होती.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, शिवसैनिकांनी मोठे परिश्रम घेऊन अनेकांना विजयी केले. त्यामुळे निवडणुका या नवीन नाहीत. मात्र, निवडणुका लढणे आणि जिंकणे याचे चांगले नियोजन झाल्यास विजय निश्चित आहे. त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकांनी आपले काम करत राहावे. दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली, तर उद्देश निश्चितपणे सफल होऊ शकते.
यावेळी अजय स्वामी यांनी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून तब्बल १४ ते १५ वर्षे काम केले आहे. या काळात प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा होती. यातूनच बहुतांश ग्रामपंचायती, पंचायत समितीवर भगवा फडकला होता. एवढेच नव्हे, तर जिल्हा परिषदेच्या समित्यासुद्धा शिवसेनेच्या ताब्यात होत्या. त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन लढल्यास पुन्हा एकदा पूर्वीचे दिवस आणणे कठिण नसल्याचे सांगितले.
मेळाव्याला अन्य उपस्थित मान्यवरांचीही भाषणे झालीत. यावेळी आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, एसटी कामगार सेना तसेच शिवसेनेच्या सर्व अंगिकृत संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिकांची उपस्थिती होती.
-----
आतापर्यंतच्या नेत्यांनी केवळ स्वहित जपले : संदीप गि-हे
शिवसेना हा जिल्ह्यात मोठा पक्ष राहिला आहे. पक्षाचा जिल्ह्यात एक आमदार होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराने तब्बल ५० हजारांहून अधिक मते प्राप्त केली. हे केवळ शिवसैनिकांच्या बळावर झाले शक्य झाले आहे. मात्र, या नेत्यांनी केवळ स्वत:चे हित जपण्यातच धन्यता मानली आहे. पक्षवाढीकडे कधीही लक्ष दिले नाही. त्यामुळेच जिल्हा परिषदेत शिवसेनेचा एकही सदस्य नव्हता. मात्र, आता प्रत्येक शिवसैनिकांनी येणा-या सर्व निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार विजयी होईल, यासाठी परिश्रम घ्यावे. जेणेकरून होऊ घातलेल्या ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळण्यापासून कुणीही राखू शकणार नसल्याचे जिल्हाप्रमुख संदीप गि-हे यांनी सांगितले.
