चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून एव्हरेस्ट सैर करण्याचा मान सुद्धा जिल्ह्यातील विद्यार्थांना मिळाला आहे.तसेच जिल्ह्यातील तरुणांची खेळांकडे वाढते आकर्षण पाहता शहरालगत असलेल्या चंद्रपूर म्हाडाच्या क्रीडांगणासाठी आरक्षित जागेवर मुलभूत व अत्याधुनिक सुविधा असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारन्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री अदिती तटकरे यांना मुंबई येथे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली यावेळी शिष्ठमंडळात मनविसे तालुकाउपाध्यक्ष करण नायर व पवन जाधव उपस्थित होते.
यावेळी गेल्या काही दिवसापासून निर्माणाधीन असलेले क्रीडा संकुलाचे काम अजून पूर्णत्वास आले नसल्याने, ह्यात विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे ते त्वरित पूर्ण करून तरुणांसाठी खुले करण्यात यावे. तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्तरावर खेळामध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना BOT तत्वावर क्रीडा संकुल जवळ दुकान गाळे उपलब्ध करून देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी.
तसेच भविष्यात होणाऱ्या ऑलम्पिक खेळांचे लक्ष्य समोर ठेऊन आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या अंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यासाठी तरुणांना जागतिक दर्जाचे क्रीडा शिक्षक नेमून मुलभूत व आधुनिक साधन सामुग्री तरुणांना पुरवावी, तसेच महाराष्ट्रात होणाऱ्या देशातील पहिल्या क्रीडा विद्यापीठाच्या धर्तीवर पुढील काळात शारीरिक शिक्षण, क्रीडा विज्ञान, क्रीडा वैदकशास्त्र, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा प्रशिक्षण इत्यादी बाबी विभागीय क्रीडा संकुलात भविष्यात समाविष्ट करण्यात याव्या यासाठी मंजुरी देण्यात यावी ज्यामुळे क्रीडा क्षेत्रात तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध होऊन रोजगाराच्या संधी क्रीडा क्षेत्रात मिळेल व शारीरिक शिक्षण, क्रीडा शिक्षण यामध्ये संशोधन व विकास चांगल्या प्रकारे करता येईल अशी चर्चा यावेळी राज्यमंत्र्यांशी करण्यात आली, व यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी मंत्रिनी शिष्टमंडळाला देण्यात आले.
