News34 chandrapur
बीड - धुलीवंदनाच्या दिवशी गावातील जावई यांचा शोध घेत वाजतगाजत गाढवावर बसवून व गळ्यात चपलेचा हार टाकून मिरवणूक काढण्यात येते.
सदर प्रथा निजाम काळापासून सुरू असून या प्रथे दरम्यान कुणाचेही भांडण होत नाही, जावई बापूंना हा प्रकार अपमानास्पद वाटत असला तरी या प्रथेला आजपर्यंत कुणाचाही विरोध झाला नाही. Holi festival 2023
मंगळवारी दि. ७ धूलिवंदन असल्याने जावयाच्या शोधत तरुणांची पथके मार्गस्थ झाली आहेत. दरम्यान, गावात स्थायिक असलेले २०० जावई भूमिगत झाले आहेत. त्यामुळे कोणत्या जावयांची गर्दभ सवारी निघणार? याकडे लक्ष लागले आहे. तालुक्यातील विडा हे ७ हजार लोकसंख्येचे गाव. गावाच्या वेशीजवळ दक्षिणमुखी हनुमान मंदिर असून गावात साधू शिव रामपुरी महाराजांची संजीवन समाधी आहे. या गावाने मध्ययुगीन संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या लळीत नाट्याची परंपरा १०० वर्षांपासून जपली आहे. maharashtra news
काय आहे ही परंपरा?
निझामकाळात गावाला जहागिरी होती. १९१५ साली जहागीरदार तत्कालीन ठाकूर आनंदराव देशमुख यांचे बाळा नाथ चिंचोली (जि.लातूर) येथील मेव्हणे धूलिवंदनाच्या दिवशी सासुरवाडीत आले होते. त्यावेळी परंपरेप्रमाणे भांग पिऊन थट्टामस्करी सुरु झाली. मस्करी तून जावयाची गाढवावर बसून सवारी काढली. तेव्हापासून ही परंपरा सुरु झाली. परंपरा कायम ठेवण्यासाठी धुळवडीच्या दोन दिवस अगोदर गावातील तरुण एकत्र येऊन जावई शोध समिती नेमतात. एका जावयास ताब्यात घेऊन धुळवडीपर्यत निगरानीखाली ठेवले जाते. धुळवडीच्या दिवशी सकाळी ग्रामपंचायतीसमोर गाढव आणून चपलेचा हार घालून मिरवणुकीला सुरू होते.
गावातील प्रमुख रस्त्यांवरून दुपारपर्यंत मिरवणूक हनुमान मंदिरासमोर पोचते. या ठिकाणी लोकवर्गणीतून जमलेल्या पैशांतून खरेदी केलेल्या कपड्यांचा आहेर गावातील प्रतिष्ठितांच्या हस्ते जावयाला दिला जातो. शिवाय जावईबापूला सासऱ्याच्या ऐपतीनुसार सोन्याची अंगठी भेट दिली जाते. गावात एकोपा व सलोखा जावयाची गाढवावरून मिरवणूक हा अपमानाचा प्रकार वाटतो परंतु, ही गावाची परंपरा मानून आज पर्यंत मिरवणुकीत कधीही भांडण झाले नाही.अगदी मुस्लिम धर्मातील सादेक कुरेशी यांनाही या मिरवणुकीचा मान मिळाला आहे.