News34 chandrapur
चंद्रपूर - काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्हा पोलिस दलात मोठे फेरबदल झाले, मात्र या बदली सत्रामुळे अनेक नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजात रंगली आहे. Chandrapur police transfer
झालेल्या बदली सत्रात वरिष्ठांना डावलून कनिष्ठ अधिकाऱ्यांना प्राधान्य दिल्याने वरिष्ठ लॉबी जाम नाराज आहे, ज्यांना अनुभव नाही त्याला मोठी जबाबदारी व ज्यांना गुन्हेगारी क्षेत्रातील अनुभवांचा पायंडा गाठला त्यांना लहान पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली असा सूर उमटू लागला आहे.
चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर आंबोरे यांना माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरी क्षेत्रात तर सध्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातील मूल येथील ठाणेदार सतिशसिंग राजपुत यांना चंद्रपूर शहराची जबाबदारी देण्यात आली. मात्र ह्या सर्व बदल्या 2024 ला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका बघता राजकीय डावपेचाच एक भाग असल्याचे बोलण्यात येत आहे. तर दुसरी बाजू म्हणजे राज्यात एकीकडे सरकार महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करतात मात्र दुसरीकडे चंद्रपूर पोलीस दलातील वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यासाठी वेटिंगवर ठेवण्यात आले. एकही महिला पोलीस अधिकाऱ्याला यात स्थान देण्यात आले नाही.
दुर्गापुर पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक जित्तावार यांना नागपूर गुन्हे शाखेचा मोठा अनुभव असताना सुद्धा त्यांना चंद्रपुरातील छोटे पोलीस स्टेशन देण्यात आले. केवळ 2 वर्षांपूर्वी पोलीस निरीक्षक पदाची बढती मिळालेले पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेचा पोलिस निरीक्षकाचा पदभार त्यांना बहाल करण्यात आला.
पडोली पोलीस स्टेशनमध्ये कोंडावार पोलीस निरीक्षक पदी असताना त्यांच्या हद्दीत एका महाविद्यालयीन मुलीचा मृत्यू झाला होता, त्यावेळी मुलींच्या कुटुंबीयांनी कोंडावार यांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करीत निलंबित करण्याची मागणी केली होती.
नुकताच स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार स्वीकारल्यावर कोंडावार यांच्या lcb पथकावर भ्रष्टाचाराचे आरोप लागले आहे.
सदर आरोपामुळे पोलीस दलाची जिल्ह्यात चांगलीच बदनामी झाली आहे. त्यामुळे या पदाचे आव्हान ते पेलण्यास त्यांचा अनुभव कमी पडेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विशेष बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षकांनी पदभार सोडला नाही, काही पोलीस निरीक्षक पदभार न सोडण्याच्या भूमिकेत आहे.
सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना अचानक बदलीच्या आदेशाने पोलीस अधिकारी याविरोधात मॅट मध्ये जाण्याच्या तयारीत आहे.
बल्लारपूर पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाला मात्र त्यांना अजूनही कार्यमुक्त करण्यात आले नाही, पण जिल्ह्यात 3 महिन्याचा कार्यकाळ शिल्लक असताना बाळासाहेब खाडे यांना स्थानिक गुन्हे शाखेतून हटवित मानव संसाधन विभागाची जबाबदारी देण्यात आली. यात कुणाचा राजकीय वरदहस्त प्राप्त तर नाही ना असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा म्हणजे किचकट गुन्हे व गुन्ह्याचा तात्काळ शोध घेण्यासाठी अग्रेसर असते मात्र अनुभवाची कमी असलेल्या अधिकाऱ्यांना जबाबदारी देणे म्हणजेच चंद्रपूर जिल्ह्यातील भविष्यात गुन्हे वाढणार असे संकेत देणे आहे.
महेश कोंडावार यांचे कोणते कौशल्य पोलीस अधीक्षक परदेशी यांना प्रभावित केले हा एक शोधाचा विषय आहे, मात्र याचा शोध गृह विभागाने घ्यायलाचं हवा.
जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांना पोलीस दलातील चांगला अनुभव आहे, भविष्यात त्यांनाही विविध ठिकाणी जावं लागेल. मात्र त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील बदलीमुळे नाराज झालेल्या अधिकाऱ्यांचा अनुभव ते सोबत घेऊन जाणार का? हा महत्वाचा प्रश्न आहे.
बदली संदर्भात अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधु यांची महिला पोलीस अधिकाऱ्यांना बदली सत्रात स्थान नाही याबाबत प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की अजून पूर्णपणे बदल्या झाल्या नाही, जेव्हा पोलीस दलातील बदली प्रक्रिया पूर्ण होणार त्यावेळी योग्य अधिकाऱ्यांना स्थान मिळेल.
विशेष म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बदली आदेशही जाहीर केले, मात्र अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांना याबाबत माहिती नाही काय यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.