News34 chandrapur
चंद्रपूर - देशातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेले नामांकित (SNDT) श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचे विदर्भातील पहिले केंद्र चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथे सुरू होणार आहे. Women's University in chandrapur
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे तब्बल 50 एकर जागेवर महाविद्यालयाची प्रशस्त इमारत येत्या काही वर्षात उभी राहणार आहे अशी माहिती विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
महिला विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र वर्ष 2023 -24 येत्या जून महिन्यापासून बल्लारपूर शहरातील नगर परिषदेच्या नेताजी सुभाष चंद्र बोस डिजिटल स्कुल मध्ये क्लासेस सुरू होणार आहे.
महिला विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्रात प्रामुख्याने कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाचा समावेश असणार आहे.
Education news
ज्यामध्ये विशेषतः इंटिरियर डिझाइन, अन्नपदार्थ प्रक्रिया व उत्पादन या विषयातील बी.वोक पदवी तसेच रुग्णालये, खनिज व वन उत्पादनांवर आधारित उद्योग यासाठी व्यवस्थापन कौशल्य विकसित करणारे B.M.S पदवी अभ्यासक्रमाची सुरुवात होणार आहे.
विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया राज्य शासनाच्या धोरणानुसार असणार मात्र चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील मुलींना विद्यापीठात प्राधान्य दिल्या जाणार असून सर्व अभ्यासक्रम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणी अंतर्गत राहणार.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबईच्या कॅम्पस च्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण परिसर बल्लारपूर येथे विद्यापीठाची 500 कोटी रुपये खर्च करून प्रशस्त इमारत उभी राहणार आहे.
विदर्भात पहिल्या महिला विद्यापीठाच्या आगमनाने अन्य जिल्ह्यातील मुलींना नवे अभ्यासक्रम शिकण्याच्या संधी प्राप्त होणार आहे.
याचा फायदा विदर्भातील अनेक दुर्गम भागातील मुलींना निश्चित मिळेल, सोबतच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या यासाठी जुहू, चर्चगेट, पुणे नंतर आता चंद्रपुरात SNDT चे नवे कॅम्पस उभारले जाणार आहे.
आतापर्यंत महिला विद्यापीठातील कौशल्य आधारित अभ्यासक्रमाचा तब्बल 50 हजार मुलींनी लाभ घेतला आहे, चंद्रपूर जिल्ह्यात सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात प्रथम वर्षी 500 विद्यार्थिनींना सदर अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येणार आहे.
बल्लारपूर येथील कॅम्पस परिसर हे मातृत्व या संकल्पनेवर आधारित असणार आहे.
इतर विद्यापीठाच्या विद्यार्थिनींना चंद्रपूरच्या मातृसंकुलात शिकण्याची व ग्रामीण संस्कृती समजून घेण्याचीही संधी मिळणार आहे.
विशेष बाब म्हणजे गरीब व दुर्बल मुलींना सदर विद्यापीठात शिकता यावे यासाठी या केंद्रात भाऊबीज निधी ची व्यवस्था असणार आहे.
सध्या या नवीन केंद्रासाठी राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विभागातर्फे 50 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात SNDT चे केंद्र निर्माण व्हावे याचा सर्वात मोठा वाटा हा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचाचं आहे अशी माहिती कुलगुरू डॉ.उज्वला चक्रदेव यांनी दिली.
आयोजित पत्रकार परिषदेत कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विभाग प्रमुख डॉ.जयश्री शिंदे व सहायक कुलसचिव डॉ.बाळू राठोड उपस्थित होते.