News34 chandrapur
चंद्रपूर, दि. 29 ऑगस्ट: राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांची शाळा व अंगणवाडी स्तरावर आरोग्य तपासणी करण्यात येते. चंद्रपूर जिल्ह्यात अंगणवाडी व शाळा ( शासकीय व निमशासकीय) तपासणीकरीता एकूण 24 पथक कार्यरत आहे. या कार्यक्रमांतर्गत 4 डीएस (जन्मतः दोष, कमतरता, रोग, विकासात्मक विलंब आणि अपंगत्व) आजाराच्या बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येते.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत 0 ते 6 वयोगटातील क्लिप लीप व पॅलेट (दुभंगलेले ओठ व टाळू)cleft lip या आजाराचे एकूण 15 बालके आढळून आले आहे. क्लिप लीप व पॅलेट या आजारामुळे बालकांना दूध ओढण्याकरिता, खाण्याकरीता तसेच बोलण्याकरीता अडचण निर्माण होऊन बालकांच्या विकासास विलंब होतो. त्या अनुषंगाने बालकांचा विकास योग्य वेळेत होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम समन्वयक व पथक यांच्या प्रयत्नाने सर्व बालकांना मोफत शस्त्रक्रियेकरीता आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी मेघे येथे पाठविले असून सदर बालकांसोबतच हृदयरोग आजाराच्या 3 बालकांना शस्त्रक्रियेकरीता पाठविण्यात आले आहे. National Child Health Programme
वरील सर्व 18 बालकांना शस्त्रक्रियेकरीता पाठविण्यासाठी जिल्हा रुग्णालयातून बसची व्यवस्था करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमचंद कन्नाके यांनी हिरवी झेंडी दाखवून बालकांना रवाना केले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत यापूर्वी कर्णदोष असलेल्या 15 बालकांना मोफत कर्णयंत्र देण्याकरीता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांच्यामार्फत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर 15 बालकांना कर्णयंत्र दिल्यामुळे कर्णबधिर बालके ऐकू लागली, बोलणाऱ्या व ऐकणाऱ्या जगात त्यांनी नव्याने प्रवेश केला असून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी कळविले आहे.