News 34 chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यात सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषदेवर गेल्या अडीच वर्षापासून काँग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेसची सत्ता आहे. शहराचा विकास होईल या आशेने जनतेने यांना भरभरून मतदान करून निवडून दिले.मात्र या सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या आशेवर अक्षरशः पाणी फेरले. जनहित विरोधी निर्णय घेऊन यांनी व्यवस्थितपणे शहराची वाट लावली आहे. Bjp hunger strike
"एकाला काहिच समजत नाही, दुसरा समजण्याच्या परिस्थितीत नाही आणि तिसऱ्याला गरजेपेक्षा जास्त समजते" यामुळे हल्लीचे सत्ताधारी हे जनतेचे हितचिंतक की शत्रू ? हेच कळेनासे झाले,अशी जळजळीत टिका गडचांदूर नगरपरिषदेत भाजपचे विरोधी पक्ष नगरसेवक अरविंद डोहे यांनी केली आहे.गृह व पाणीपट्टी करावरील 2 टक्के व्याज रद्द करावा आणि पंतप्रधान योजनेच्या लाभार्थ्यांना शेवटची थकलेली रक्कम द्यावी,या दोन मागण्यांच्या पूर्ततेसाठी भाजपतर्फे आमरण उपोषणाला बसलेले भाजप दलित आघाडी शहराध्यक्ष प्रशांत खाडे व शक्ती केंद्र प्रभारी बब्लू रासेकर यांच्या उपोषण स्थळातून डोहे बोलत होते.
स्वतःचे स्वार्थ साधण्यासाठीचे निर्णय घेण्याचे काम याठिकाणी सुरू असून शहरात पहिलेच दारू दुकाने भरपूर असताना पुन्हा नवीन स्थलांतरित दारू दुकानाला ना-हरकत देण्यासाठी चक्क विशेष सभा नगराध्यक्षांनी लावली. नगरपरिषदेच्या फंडात पैसे नसल्यामुळे मागील अंदाजे बारा महिन्यांपासून सफाई कामगारांचे वेतन थकले आहे, त्यांची चिंता यांना नाही, दरवर्षी होणारी 90 टक्के टॅक्स वसुली यंदा मात्र 30 टक्के झाली,यावर मंथन नाही.कोरोनाने लोकांचे कंबरडे मोडले,आर्थिक बजट बिघडल्याने थकबाकी वाढली. शहरात कित्येक ठिकाणी अस्वच्छता पसरली आहे,त्याची यांना काहीच चिंता नाही. नगरपरिषदेने जर नागरिकांना गृह व पाणीपट्टी करा मध्ये 1 टक्क्यांची सूट दिली असती तर निश्चितच आज वसुली वाढली असती,मात्र असे झाले नाही. उलट यांनी दंड म्हणून मुळ रकमेवर 2 टक्के व्याज लावण्याचा निर्णय घेतला. यामुळेच वसुलीत घट झाल्याचे पहायला मिळत आहे.सत्ताधाऱ्यांच्या अशा चुकीच्या धोरणांमुळेच नगरपरिषदेची पुरती वाट लागली असल्याचा सनसनाटी आरोप सुद्धा नगरसेवक डोहे यांनी केला आहे.
नगरपरिषदेत 20 तारखेला सर्वसाधारण सभा झाली. अनेकांना आशा होती की,सत्ताधारी उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करून दिलासा देतील, मात्र विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या विरोधा नंतरही यांनी त्या मागण्या पूर्ण केलेल्या नाही.यावरून लक्षात येते की,यांना जनतेशी तिळमात्र ही देणेघेणे नाही."हम करे सो कायदा" याप्रमाणे कारभार सुरू असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.आज उपोषणाचा तिसरा दिवस उजाडला,अजुनही संबंधित शासनप्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे ढुंकूनही पाहिले नाही. असे असताना मात्र जोपर्यंत मागण्या पुर्ण होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही,अशी भुमीका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.तापमाना बरोबरच आंदोलनाचा पारा सुद्धा चढतीवर असून पुढे काय घडणार ! याविषयी उत्सुकता वाढली आहे. शिवसेना गटनेता तथा शिवसेना तालुका प्रमुख सागर ठाकुरवार,नगरसेवक शेख सरवर,नगरसेविका सौ.गोरे, सौ.कोडापे,भाजपचे महादेव एकरे,अरविंद कोरे, संदीप शेरकी,हरी घोरे,माजी न.प.नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे,सौ.रंजना मडावी,राकेश अरोरा, कृष्णा भागवत,सोमेश्वर क्षीरसागर,देवीदास पेंदोर, अशोक दरेकर,हितेश चव्हाण,दीपक गुरनुले, जगन्नाथ कापसे,गडचांदूर तालुका संघर्ष समितीचे अशोक उमरे, उद्धव पुरी आदी महिला, पुरूष नागरिकांनी उपोषण मंडपाला भेट देऊन आपले समर्थन दिल्याचे कळते."दारू दुकानाला परवानगी देण्यासाठी हे विशेष सभा बोलवतात,मग या दोन मागण्यांसाठी सुद्धा विशेष सभा बोलावून यांनी मागण्या मान्य करायला हव्या" असे सुर शहरात ठिकठिकाणी उमटत आहे.
