News 34 chandrapur
चंद्रपूर : धार्मिक स्थळ, शैक्षणिक संस्था, रुग्णालयाजवळ निवासी वस्तीत देशी दारु दुकानाचे स्थालांतरण, बियर शॉपी, वाईन शॉपींना राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियम धाब्यावर बसवून मंजूरी दिली. पोलिसांनीसुद्धा डोळेझाक करून दुकानदाराच्या बाजूने अहवाल सादर केला.
अन् जिल्हा प्रशासनाने या स्थानांतराला, दुकान वाटपाला मंजुरी दिली. मनपाच्या सक्षम अधिकाऱ्याकडून दुकानाचे बांधकाम अधिकृत असल्याचा दाखला घेणे नियमानुसार आवश्यक आहे.परंतु सर्वच प्रकरणात असा दाखला घेण्याचे जाणीवपूर्वक टाळण्यात आले. त्यामुळे सर्वच दारू दुकानांचे स्थानांतरण व मंजुरी आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. Liquor shop
राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस विभाग व जिल्हा प्रशासनाच्या मेहेरबानीने आर्थिक देवाणघेवाणीतून स्थानांतरणाला परवानगी देत पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला. नियम डावलून वाटप केलेल्या दारू दुकानाविरोधात बुधवार दि. ११ मे रोजी सकाळी ११ वाजता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शने करणार आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस विभाग व महसूल विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची शासनस्तरावर पुराव्यानिशी तक्रार करून निलंबनाची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला संदिप कष्टी,घनश्याम येरगुडे, मनिषा बोबडे,कविता अवथनकर,अरूणा महातळे,मेघा दखणे,अजय महाडोळे, जैन श्वेतांबर मुर्तीपूजक संघाचे दिलीप खजांजी, राजेश डागा, गौतम कोठारी, अनिल बोथरा,प्रतीक बैद, इमदाद शेख,अक्षय येरगुडे, आकाश लोडे,प्रफुल बैरम,अमोल घोडमारे, नितीन झाडे, अभिजित मोहगावकर, शाहरुख मिर्झा, निलेश लोणारे उपस्थित होते.
Janvikas sena chandrapur
धार्मिक स्थळाबाबत अहवालात लपवणूक
दाताळा रोडवरील देशी दारु दुकानाच्या उत्तरेकडून रस्ता असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालात दाखविले आहे. मुळात दुकानाच्या उत्तर व दक्षिणेकडे खासगी प्लॉट आहेत. पश्चिमेकडील प्रस्तावित रस्त्याची मंजूरी वादात सापडली आहे. हाकेच्या अंतरावर जगन्नाथबाबा मठ, चर्च, बालाजी मंदिर व हनुमान मंदिर असल्याची बाब जाणीवपूर्वक पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालात लपविण्यात आली. नागपूर रोडवरील महालक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये स्थानांतरित देशी दारू दुकाला लागून नोंदणीकृत बाल रुग्णालय तसेच दत्त मंदिर, प्राथमिक शाळा असल्याची बाब राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस विभागाचा अहवालामध्ये दडपण्यात आली आहे.
प्रवेशद्वार बंद करण्याचा सल्ला
केडी कॉम्प्लेक्सच्या मंजूर नकाशात उत्तर-दक्षिण दोन्हीकडे प्रवेशद्वार आहेत. दक्षिणेकडील प्रवेशद्वारापासून २५ ते ३० मीटर अंतरावर डॉ. कोलते यांच्या दवाखान्यामागे नागदेवतेचे नोंदणीकृत मंदिर आहे. या मंदिरामुळे अडचण निर्माण होऊ नये म्हणून दक्षिणेकडील मंजूर नकाशातील प्रवेशद्वार तात्पुरते बंद करण्याचा सल्ला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भ्रष्ट अधिकार्यांनी दुकानदाराला दिला. देशी दारू दुकानाच्या समोर संरक्षित श्रेणीतील शंभर वर्षे जुने पवित्र वडाचे झाड आहे. अहवालामध्ये हेतूपुरस्पर वडाचे झाड व टायपिंग इन्स्टिट्यूट बाब लपवली आहे.
जैन मंदीराला लागूनच बिअर व वाईन शॉपला मंजूरी
सराफा बाजारामध्ये असलेल्या जैन मंदिराला लागून काळे यांचे फटाक्याचे दुकान होते. या दुकानांमध्ये आता बिअर शॉपी व वाईन शॉप सुरू होणार असल्याने जैन मंदिरात येणारे भाविक व परिसरातील सराफा व्यावसायिक संतापलेले आहेत. जैन मंदिराला लागून बिअर शॉपी किंवा वाईन शॉपीला राज्य उत्पादन शुल्क विभाग,पोलीस विभाग किंवा जिल्हा प्रशासन कशी काय मंजुरी देऊ शकते ? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहे.
