प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - तत्कालीन काळात उत्तम शेती,मध्यम व्यापार,कनिष्ठ चाकरी अशा पद्धतीने देशाची व राज्याची लोकशाही चालत होती परंतु आता चित्र अगदी उलट झालं आहे. आता उत्तम नौकरी, मध्यम व्यापार, आणि कनिष्ठ शेती पाहायला मिळत आहे. आजचा बळीराजा सारा जगाचा पोशिंदा आहे. Farmer देशातल्या नागरिकांच्या पोटाची चिंता करता-करता स्वतः मात्र उपाशी व कर्जबाजारी जीवन जगण्याची वेळ बळीराजावर आलेली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामा करिता धानाचे उत्पन्न घेण्यासाठी प्रति एकर खर्च नांगरणी ९००/-,धानाची बिजाई ९००/- चिखल करणे ट्रॅकटरला २ तास १४००/- रोवणा खर्च मजुरी ३५००/- खत २ बॅग २२००/- निंदन करणे १०००/- रोगावर औषध फवारणी १०००/- कापणी आणि बांधणी ३६००/- चूर्णा खर्च १३००/- असा सर्व खर्च एकरी १५८००/-रुपये आला आहे. आणि शेतकऱ्याला एका एकरात उत्पन्न फक्त १३ पोते धान म्हणजे ८क्विंटल ४५किलो धानाला भाव मिळाला प्रति क्विंटल २१५०/-रुपये म्हणजे एक एकरात एकूण उत्पन्न झाले १८१६७/- आणि खर्च करावा लागला १५८००/- त्याला निव्वळ नफा मिळाला फक्त २३६७/- म्हणजे त्याच्या मेहनतीची किंमत शून्य अशा अवस्थेत मुलांचे शिक्षण, मूळ-मुलींचे लग्नकार्य, वर्षभराचा खर्च, कपडे,किराणा, घरगुती लाइटबिल, औषध, डाँक्टर खर्च आणि लोकांचे देणे घेणे अशी बळीराजा शेतकऱ्यांची व्यथा आहे. यातही अवकाळी पाऊस, निसर्गाचा कोप,रोगराईचे प्रादुर्भाव, आणि हातात पीक येतांना वन विभागाने पोसून ठेवलेले रानटी डुकरांचा हैदोस, मागील वर्षीतील डुकरांच्या नुकसान केलेली भरपाई अजूनही मिळालेली नाही. याला जबाबदार कोण. सरकारला मात्र डुकरांपासून मोट्या प्रमाणात वार्षिक उत्पन्न लाखात मिळते. अशी अवस्था बिचाऱ्या बळीराजा शेतकऱ्यांची आहे. आहे तरी सुद्धा देश व राज्य चालविणारे राजकीय नेते मोठ्याने भाषण देतात की, आपला देश महान, जय जवान-जय-किसान हा नारा मात्र वर्षातून १५ आगस्ट व २६ जानेवारी देऊन वर्ष भर जगाचा पोशिंदा माय-बाप मरो आणि माझं पोट भरो अशी या देशातील राज्यकर्त्यांची भूमिका दिसून येत आहे. मुल-सावली तालुक्यातील धान पीक कापणीत आकस्मिक अवकाळी जोरदार पाऊस आल्याने दोन्ही तालुक्यातील धानाच्या सरड्या पाण्यात बुडून राहिल्या याची माहिती राज्यकर्त्यांना मिळाली आणि राज्याचे कृषिमंत्री नाम.दादा भुसे व पालक मंत्री नाम.विजय वडेट्टीवार यांचे सोबत जिल्हाधिकारी,जिल्हा कृषी अधिकारी यांनी दौरा काढून प्रत्यक्ष मुल-सावली मधील शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पाहणी केली. आपण खचून जाऊ नका शासन तुमच्या पाठीशी भक्कम उभा आहे.काहीही कमी पडू देणार नाही. शेतकऱ्यांच्या विम्याचे पैसे ८ ते १० दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील असे जाहीर आश्वासन दिले. शासनाकडूनही नुकसान भरपाई देण्यात येईल म्हणून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी तलाठ्यांकडे आपला ७/१२,आधार कार्ड व बँक पासबुक त्वरित जमा करायला सांगितले. ही माहिती नोव्हेम्बर २०२१ मध्ये मागितली परंतु आता २०२२ या नवीन वर्षातील जानेवारी महिना अर्धा होत आला तरी देखील शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाही. शासनाकडून कुठलीही नुकसान भरपाई मिळालेली नाही. कृषिमंत्री व पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी दिलेले आश्वासन देखील अवकाळी पावसात वाहून गेले की,काय अशा प्रतिक्रिया सावली-मुल तालुक्यातील नुकसानग्रस्त अनेक शेतकरी बाधवांनी व्यक्त केल्या आहेत. अवकाळी पावसात भिजलेल्या व जागेवरच वापुन कोंब आलेल्या धानाला व्यापारी मातीमोल भाव, कोणताही व्यापारी असे धान घ्यायला तयार नाही. शेतकऱ्याजवळ एक पैसा नाही. आणि कापणी-बांधणी व चूर्णा केल्याचे पैसे अजूनही देणे बाकी आहे. तेव्हा आतातरी कृषिमंत्री, पालकमंत्री, आणि लोकप्रतिनिधी, व जिल्हाधिकारी शासन जागे होतील काय असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी राज्यकर्त्यांना केला आहे.
