गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्याच्या हद्दीत पेसा क्षेत्रातील धनकदेवी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मरकागोंदी शिवारातील शासकीय महसूल जमिनीवरील पकडीगड्डम जलाशयाच्या संचयन भागाला लागून असलेल्या जमिनीतून विना परवानगी चोरीने मुरूम उत्खनन करून हायवाद्वारे अविरतपणे आणले जात आहे.यामुळे संबंधित CONTRACTOR कंत्राटदार मोठ्याप्रमाणात शासनाचा महसुल बुडवत असल्याचे स्पष्ट होत असून चोरीने उत्खनन केलेल्या या मुरूमाचा वापर उंबरहिरा,जांभूळधरा तसेच वनसडी कारगाव (बु) या रस्त्याच्या कामासाठी होत असल्याची माहिती आहे. यामुळे जिवती तालुक्यातून विना परवानगीने मुरूम चोरीने कोरपना तालुक्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
मागील अनेक दिवसांपासून याठिकाणी मोठ्याप्रमाणात हा प्रकार सुरू असताना संबंधित महसूल अधिकार्यांना याची माहिती नसावी ! हे मात्र कोडेच बनले आहे.दरम्यान ही बाब कोरपना महसूल अधिकाऱ्यांना माहित होताच मंडलाधिकारी राजेंद्र पचारे व येरगव्हान तलाठी कुळमेथे यांनी ताफ्यासह मौका चौकशी केली असता त्याठिकाणी उत्खनन केलेला खड्डा दिसून आला व मोक्यावर मयुर कंस्ट्रक्शनची JCB जेसीबी मशिन आढळली.मात्र मुरूमाची वाहतूक करणारा हायवा,चालक घेऊन पसार होण्यास यशस्वी झाल्याचे कळते.ज्या ठिकाणी हे उत्खनन सुरू होते तो क्षेत्र जिवती तहसिल अंतर्गत येत असल्यामुळे पुढील कारवाई त्यांच्याकडून होईल,याविषयी त्यांना माहिती देण्यात आल्याची जानकारी मंडलाधिकारी पचार यांनी News34 ला दूरध्वनीवरून दिली आहे.याभागात इतक्या मोठ्याप्रमाणात विना परवानगी मुरूम,लाल खडक या गौण खनिजाची चोरी होत असताना संबंधित विभागाचे अधिकारी यापासून अनभिज्ञ कसे ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून याविषयी उलटसुलट चर्चांना कमालीचे उधाण आले आहे.एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कित्येकांना परिवाराचे पालनपोषण करणे कठीण झाले तर दुसरीकडे अशा कंत्राटदारांना अच्छे दिन आल्याची उपहासात्मक चर्चा ऐकायला मिळत आहे.विना परवानगीने मुरूम उत्खनन करून शासनाची फसवणूक करणाऱ्या या कंस्ट्रक्शन कंपनीवर जिवती येथील महसुल विभाग काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.