गडचांदूर :- गडचांदूर शहरात विराजमान आंतरराष्ट्रीय दर्जाची माणिकगड सिमेंट कंपनीतून निघणारी धूर व जळालेली भुकटी हवेत मिसळून मोठ्याप्रमाणात वायू व ध्वनी प्रदूषण होत असल्याने स्थानिक नागरिकांचे आरोग्य अक्षरशः धोक्यात आले आहे.नागरिकांच्या अनेक तक्रारी व मागणीनुसार आता स्थानिक नगरपरिषदेने पाऊले उचलण्यास सुरूवात केल्याचे दिसत असून माणिकगड सिमेंट कंपनीवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नगरपरिषदेने दिला आहे.काही दिवसापूर्वी कंपनी व्यवस्थापन अधिकारी,नगरपरिषद पदाधिकारी व अधिकार्यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीच्या चर्चेनुसार कंपनीकडून होणारे वायू, जल व ध्वनी प्रदूषण कमी करणे,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाठविण्यात येणाऱ्या अहवालाची प्रत नगरपरिषद कार्यालयास सादर करणे,तसेच कंपनीमार्फत वृक्ष लागवडीबाबतचा कृती आराखडा तात्काळ नगरपरिषदेला सादर करणे,असे निश्चित करण्यात आले होते. Legal action
मात्र यावर अजूनही कंपनीकडून कोणत्याही प्रकारची पावले उचलण्यात आलेली नाही.नगरपरिषद क्षेत्रात मोठ्याप्रमाणात होणारे प्रदूषण ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने नागरिकांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून याबाबतीत आजपावेतो कुठलीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याची आठवण पत्राद्वारे कंपनीला करून देण्यात आली आहे.यापुर्वी प्रदुषणाबाबत नगरपरिषदेने सदर कंपनीवर 33 हजार 500 इतक्या रकमेची दंडात्मक कारवाई केली होती हे मात्र विशेष. air pollution
नागरिक व काँग्रेसचे गटनेते,नगरसेवक विक्रम येरणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली असता सदर बाब गंभीर आहे.आपण केलेल्या कार्यवाहीचे छायाचित्र सादर करावे व सदरची खात्री होण्यासाठी नगरपरिषदेचे पदाधिकारी व अधिकारी यांचा प्रदूषण उपाययोजना वरील प्रत्यक्ष पाहणी दौरा आयोजित करून तात्काळ या कार्यालयात अवगत करावे.अन्यथा आपणावर महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 278 व 280 अन्वये तरतुदीनुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची गंभीरतेने नोंद घ्यावी,अशाप्रकारची नोटीस मुख्याधिकारी यांच्या सहीनिशी कंपनीला देण्यात आली आहे. आता कंपनी प्रशासन प्रदुषणाविषयी केव्हा आणि कशाप्रकारे उपाययोजना करते याकडे गडचांदूरकरांचे लक्ष लागले आहे.
------------//---------
प्रदूषण हा आजचा विषय नाही,अनेक वर्षांपासून माणिकगड सिमेंट manikgad cement कंपनीकडून मोठ्याप्रमाणात शहरात धूळ सोडण्यात येत आहे. याबाबत आजपर्यंत नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या.मात्र कंपनी प्रशासन वेगवेगळ्या पक्षातील स्थानिक पुढाऱ्यांना सोबत घेऊन कंपनीच्या सुरात सूर मिळवत असते.त्यामुळे कंपनीचे मनोबल वाढले असून नागरिकांच्या तक्रारी नंतरही वायू व ध्वनी प्रदूषण वाढतच आहे.गडचांदूर येथील नागरिकांनी पक्षभेद विसरून संघटितपणे प्रदूषणाविरोधात लढण्याची सध्या गरज आहे.
विक्रम नामदेवराव येरणे
नगरसेवक तथा गटनेता काँग्रेस
-----------//-----------
माणिकगड सिमेंट कंपनीतील प्रदूषण नियंत्रण यंत्र उत्तमरित्या कार्यन्वित नाही.नागरिकांना आंदोलनं किंवा मोहीम राबवावी लागणे हे लोकप्रतिनिधींचे अपयश आहे. स्थानिक खासदार, आमदार, नगरपरिषदेतील लोकप्रतिनिधी यांनी हा प्रश्न लावून धरल्याशिवाय या प्रश्नावर मार्ग निघणार नाही. नगरपरिषदेने कंपनी प्रशासनाला नोटीस पाठवून जाब विचारताना कंपनीला उत्तर देण्यासाठी वेळेची मर्यादा घालायला हवी.तसे न केल्याने कंपनी प्रशासन वेळकाढूपणा करू शकते.नागरिकांनी सामूहिक आवाजात लोकप्रतिनिधींना जाब विचारणारा हवा. न्यायालयीन लढा हा शेवटचा उपाय ठरेल.
ॲड. दीपक चटप
-----------//---------