गडचांदूर :- प्रवाशांना सुरक्षेची हमी देणार्या एसटी महामंडळाचे चालक,वाहक व इतर संबंधित कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.महाराष्ट्राची जीवनवाहिनी लालपरी थांबल्याने विविध काळीपिवळी वाहतुकदारांची बल्ले बल्ले होत आहे. यासर्व घडामोडीत बिचार्या निष्पाप प्रवाशांचे अतोनात हाल होत असल्याचे चित्र असून एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे ही प्रमुख मागणी कर्मचाऱ्यांनी रेटून धरली आहे.ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर पुकारलेल्या या संपामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवळी अंधारात गेली,कित्येकांनी आत्महत्या केल्या,निलंबन झाले,मात्र अजूनही यावर तोडगा निघालेला दिसत नाही.
नाईलाजाने प्रवाशी खाजगी वाहनांकडे वळल्याचे चित्र असून पुर्वी 'खाजगी पेक्षा एसटीचा प्रवास सुरक्षित' म्हणणारे आता लोकांची गैरसोय टाळण्यासाठी काळी पिवळी व इतर खाजगी वाहनांचा वापर करण्याचा सल्ला देत असल्याची चर्चा आहे.असे असताना गडचांदूर शहरातून चालणार्या विविध काळी पिवळी वाहतुकीला अच्छे दिन आले असून प्रवाशांची मोठ्याप्रमाणात आर्थिक लूट होत असल्याची ओरड सुरू आहे. Msrtc strike
दिवसा गडचांदूर ते राजूरा 50 रुपये, गडचांदूर ते जिवती 50 रुपये,गडचांदूर ते कोरपना 40 रुपये तर संध्याकाळच्या सुमारास मनमानी दर विविध काळी पिवळी वाहतुकदार आकारत असल्याने गोरगरीब प्रवाशांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.दररोज विविध कामानिमित्त लोकांना एक ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करावे लागते. अगोदरच कोरोना व महागाईने कंबरडे मोडले,आर्थिक बजेट खोळंबले असताना दुसरीकडे एसटीचा संप नागरिकांच्या जिव्हारी लागला आहे.वाहतुकीची परवानगी देण्यात आली परंतु दर निश्चित न केल्याने मोठ्याप्रमाणात आर्थिक लूट सुरू आहे.प्रवाशांना वेठीस धरून आर्थिक लूटीचे प्रकार थांबविण्यासाठी संबंधितांनी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.काही का असेना एसटीच्या संपामुळे येथील विविध काळी पिवळी वाहतुकदारांची बल्ले बल्ले होताना दिसत आहे.
