चंद्रपुर:- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा बफर झोनमध्ये असलेल्या चिचोली गावातील निर्दोष नागरिकांना संशयाच्या आधारे वन विभागातील अधिकाऱ्यांनी अमानुष मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना अत्यंत निंदनीय असून क्रुरतेची परिसीमा गाठणारी आहे. निर्दोष लोकांना बेदम मारहाण करणाऱ्या वन विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना तत्काळ बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी राजु झोडे व अन्यायग्रस्त गावातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली. Chandrapur forest department
दिनांक २४/११/२०२१ ला वनविभागाचे आठ ते नऊ कर्मचारी दुपारी एक वाजता चिचोली गावात आले व त्यांनी ईश्वर रामटेके, हनुमान आसुटकर, संदीप आसुटकर यांना hunting शिकारीच्या संशयावरून वन विभागाचे कार्यालय येथे नेऊन बेदम मारहाण केली. प्लास्टिकच्या दांड्याने पाठीवर व पायावर बेदम मारहाण केली तसेच चार्जिंग बॅटरी द्वारे त्यांच्या हाताला व पायाला करंट लावले. आकाश चांदेकर यांना निर्वस्त्र करून त्यांच्या गुप्तांगावर करंट लावले. आमचा काय दोष? म्हणून अधिकाऱ्यांना विचारपूस केली असता तुम्ही शिकार केली म्हणून खोटा आरोप करून गावकऱ्यांना अमानुष मारहाण केली. हनुमान आसुटकर यांना चंद्रपूर येथील रामबाग नर्सरी येथे आणून बेदम मारहाण केली व संध्याकाळी संदीप व ईश्वर यांनासुद्धा रामबाग येथे आणले व त्यांच्या तळपायाला करंट लावले. एका अधिकाऱ्याने तर दोन्ही मांडीवर पाय ठेवून अतोनात पिळा दिली व रात्री आठ वाजता घरी पाठविले. दुसऱ्या दिवशी पुन्हा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत बोलावून अमानुषपणे मारहाण केली व पुन्हा करंट लावले. आकाश चांदेकर, संदीप नेहारे, मंगेश आसुटकर यांना बोलावून बेदम मारहाण केली व त्यांना सुद्धा हाताला व पायाला करंट लावले.अशाप्रकारे अनुसूचित जाती व जमातीच्या निर्दोष नागरिकांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले. याची माहिती गावातील नागरिकांनी तात्काळ राजू झोडे यांना दिली तसेच तात्काळ राजु झोडे अन्यायग्रस्त नागरिकांना भेट देऊन अन्याय करणार्याला सोडणार नाही असे आश्वासन दिले. व लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी गावकर्यांसोबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून लवकरात लवकर दोषींची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व जो कोणी दोषी असेल त्यांना तात्काळ dismiss बडतर्फ करावे अशी मागणी केली.
अनुसूचित जाती व जमातीच्या निर्दोष लोकांना फक्त संशयाच्या आधारावरून मारहाण केली ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून अत्यंत निंदनीय आहे. जर पीडित गावकऱ्यांना तात्काळ न्याय मिळाला नाही तर या विरोधात संपूर्ण गावकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजू झोडे ऍड फरहत बेग यांनी पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना दिला. तक्रार करताना राजू झोडे, आकाश चांदेकर, संदीप नेहारे, मंगेश आसुटकर, ईश्वर रामटेके, हनुमान आसुटकर, संदीप आसुटकर तथा अन्य गावकरी उपस्थित होते.
याप्रकरणी गावकऱ्यांच्या तक्रारीवरून वनविभागातील 2 कर्मचाऱ्यांवर दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, वनविभाग त्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
