गडचांदूर :- कोरपना तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिवाळीच्या तोंडावर नवीन फंडा सुरू केल्याची माहिती असून चक्क संबंधीत अधिकार्यांच्या नावाने समस्त स्वस्त धान्य दुकानादाराकडून लाखोंची वसुली केली जात असल्याची खमंग चर्चा ऐकायला मिळत आहे.मागील वर्षी २०२० मध्ये कोरोनाच्या काळातही यांनी अशाच प्रकारे वसूली केल्याची चर्चा ठिकठिकाणी सुरु आहे.अशाप्रकारे अधिकाऱ्यांच्या नावाने स्वस्त दुकानदाराकडून वसूली करणे कितपत योग्य ? याची माहिती संबंधीत अधिकार्यांना आहे का ? असे नाना प्रश्न नागरिकांना पडले आहे.
शासनाकडून दुकानदारांना आलेले कमिशन वाटप करण्यासाठी नुकतीच सर्व दुकानदारांची एक विशेष सभा आयोजीत करण्यात आली.यात अधिकाऱ्यांना दिवाळीची भेट देण्यासाठी तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदाराकडून प्रत्येकी ५ ते १० हजार रूपये किंवा पहिल्या मे महिन्याच्या मोफत धान्य वितरण कमिशन रकमेची ५० टक्के रक्कम जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. "अन्यथा तुमच्या कमिशनची रक्कम लवकर मिळणार नाही" असा दम भरण्यात आल्याची चर्चा आहे. आता प्रश्न हा पडतो की,वसूलीतून गोळा केलेली रक्कम खरोखरच अधिकाऱ्यांच्या खिशात जाणार ? की अधिकाऱ्यांच्या नावाने निवळ याठिकाणी वसुलीखोर आपली पोळी भाजून घेत आहे.याविषयी अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे.
सदर प्रकरणी बरेच स्वस्त धान्य दुकानदाराकडून तिव्र नाराजीचे सूर उमटत असून कमिशनची वाट लागेल या भीतीपोटी दिवाळीचा बोजारा दिल्याची उपहासात्मक चर्चा आहे.यापूर्वी महाराष्ट्र विधीमंडळ अंदाज समिती या भागात दौरा करणार आहे म्हणून प्रत्येक दुकानदाराकडून पाचशे ते हजाराची वसूली केल्याची चर्चा असून आता पुन्हा अधिकाऱ्यांच्या नावावर दिवाळीची वसूली ! आश्चर्यचकित करणारी बाब आहे. दोन वर्ष कोरोनामुळे शेतकरी,सर्वसाधारण कष्टकरी नागरिक बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करत यंदाची दिवाळी साजरी करण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करताना दिसत आहे तर दुसरीकडे अशाप्रकारे वसूली सुरू आहे.कदाचित यालाच म्हणतात टाळूवरचे लोणी खाणे अशी जळजळीत भावना अनेकांकडून व्यक्त होत आहे.असे असताना ऐकायला मिळत असलेली वसूलीची चर्चा "खरी की खोटी" याविषयी नागरिक संभ्रमात असून उलटसुलट चर्चांना कमालीचे उधाण आले आहे.
----------//---------
याविषयी काहीच माहिती नसून ती मंडळी जर अशाप्रकारे वसूली करीत असेल तर हे चुकीचे आहे.वाटल्यास त्यांनी वर्गणी गोळा करून गोरगरिब,गरजूंना मदत करावी जेणेकरून त्यांची दिवाळी गोड होईल.कोरोनामुळे घरचा कमावता पुरूष गेल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबांना मदत करावी. अधिकाऱ्यांच्या नावाने वसुली करणे सपशेल चुकीचे,याला कदापी समर्थन नाही.
(पुरवठा अधिकारी कोरपना)
-----------//---------
