मूल (गुरू गुरनुले)
पाच वर्षापुर्वी मंजुर झालेल्या बेंबाळ येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत पूरक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामासह दस्तऐवजांची चौकशी करून संबंधिता विरूध्द कारवाई करावी. या मागणीसाठी ग्रामस्थांनी येथील पंचायत समिती समोर दोन दिवसांपासुन साखळी उपोषणाला Chain fast प्रारंभ केला आहे.
ग्रामस्थांची मागणी आणि पाण्याची समस्या लक्षात घेवुन तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी २०१४-१५ मध्ये बेंबाळ वासीयांसाठी १ कोटी ५लाख ३२ हजार ५६० रूपये खर्चाची पुरक नळ पाणी पुरवठा योजना मंजुर केली. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिनस्त सदर काम करण्यासाठी सर्व सोपस्कार पुर्ण करून चंद्रपुरातील दिपक गोणेवार नामक कंञाटदारास २५ जुन २०१५ रोजी काम करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार सदर योजनेच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम पुर्ण झाले. परंतु अजूनपर्यंत बेंबाळ वासीयांना योजनेचे पाणी मिळालेले नाही. यासंबंधी उच्चस्तरीय चौकशी करण्यात येवुन भ्रष्टाचार करणाऱ्या विरूध्द कठोर कारवाई करावी म्हणून २०१७ मध्ये विकास वाळके यांनी वरीष्ठांकडे तक्रार केली. परंतु सदर निवेदनावर थातुर माथुर चौकशी करून मागणी दडपण्यात आली. त्यावेळी सदर योजनेत केलेला लाखोंचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी पाईपलाईनचे नाममाञ काम करण्यात आले. गावामध्ये पाण्याच्या तीन टाक्या असून एक पाण्याची टाकी जीर्णावस्थेत आहे तर सुस्थितीत असलेली टाकी कित्येक वर्षापासून बंद आहे. सध्या स्थितीत गडीसुर्ला प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजने अंतर्गत गावातील काही भागात पाणीपुरवठा होत आहे. परंतु राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याने शेकडो बेंबाळवासीय आजही तहाणलेले आहेत. सदर योजनेला सहा वर्षे होऊनही पाणीपुरवठा होत नाही त्यामुळे गावातील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. सदर मागणीच्या पुर्ततेसाठी गावकऱ्यांनी यापूर्वीही आंदोलन केले, त्यावेळी महिन्याभरात पाणी पुरवठा सुरू केला जाईल असे आश्वासन देवुन वेळ मारून नेण्यात आली. परंतु परिस्थिती आजही जैसे थे आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत National Rural Drinking Water Scheme पूरक नळ पाणी पुरवठा ही बेंबाळ ग्राम पंचायतची स्वतंत्र योजना असुन याकरीता मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ४९ अन्वये ग्राम पंचायतची उपसमिती निर्माण करण्यात आली आहे. ग्राम सभेच्या माध्यमातुन निर्माण करण्यात आलेल्या उपसमितीचे अध्यक्ष पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, असुन सदर योजनेच्या कामावर देखरेख ठेवुन १८ महीण्यात सदर काम पुर्ण करून घेण्याची जबाबदारी शाखा अभियंता सतिश गोर्लावार आणि चंदु मारगोनवार यांची होती. परंतु उपसमितीचे अध्यक्ष आणि शाखा अभियंता यांच्या निष्काळजीपणामूळे सदर योजना अजूनही रखडलेली आहे. ही बाब गंभीर असुन शासकिय निधीचा गैरव्यवहार करणारी आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीने शाखा अभियंता सतीश गोरलावार यांचेशी मोबाईलवर संपर्क करुन पाणी पुरवठा सुरु का नाही झाला, अशी विचारणा केली असता पाणी पुरवठा सुरु झाल्याचे सांगितले. परंतु गावातील नागरिकांना पाणी मिळाले असते तर उपोषणाला बसण्याची पाळीच आली नसती असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे सदर योजनेच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा. योजनेची दुरूस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत सुरू करण्यात यावा आणि पाणी पुरवठा उपसमितीच्या संपुर्ण दस्तऐवजांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नियुक्त करावी. आदी मागण्यांच्या पुर्ततेसाठी ग्रामस्थांच्या वतीने बेंबाळ येथील दिपक वाढई, दिवाकर कडस्कर, पवन निलमवार, विकास वाळके, चांगदेव केमेकर, सुहास वाढई, विजय बोम्मावार, वासुदेव तिमांडे, लवसन वाढई, सुरेश झाडे, पराग वाढई आणि साईनाथ मेश्राम यांनी येथील पंचायत समिती समोर बेमुदत साखळी उपोषणाला प्रारंभ केला आहे.
