कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर शासनाच्या हायब्रिड अन्युईटी कार्यक्रमांतर्गत भोयगाव, गडचांदूर,जिवती रस्ता व गडचांदूर, पाटन, वणी राज्यमार्ग ३७३ रस्त्याचे ७४.० कि.मी.लांबीत सुधारणा करण्यासाठी २९ जूलै २०१९ रोजी भूमिपूजन होवून कामाला सुरुवात पण झाली. अत्यंत संथगतीने सुरू असलेले हे काम नागरिकांना डोकेदुखी ठरत आहे. उदाहरणार्थ गडचांदूर येथील स्व.राजीव गांधी चौक(पेट्रोल पंप चौक)पासून माणिकगड सिमेंट कंपनी गेट पर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी मागील ६ ते ७ महिन्यापूर्वी संपूर्ण रस्ता खोदण्यात आला.अनेक वर्षापासूनची मागणी पुर्ण होत असल्याने नागरिक आनंद व्यक्त करताना दिसत होते. मात्र गेल्या ४ ते ५ महिन्यापासून सदर रस्त्याचे काम बंद पडलेले आहे. येथील काही सुज्ञ नागरिकांनी अनेकदा काम सुरू करण्यासाठी संबंधितांकडे तक्रार केली मात्र परिस्थिती जैसे थेच बनून आहे.यामुळे नागरिकांना मोठ्याप्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत असून याठिकाणी अपघाताची मालिका सुरू झाली आहे.हे चित्र पाहून येत्या आठ दिवसांत या रस्त्याच्या कामाला सुरुवात करून पुर्ण करावे अन्यथा स्थानिक रामकृष्ण हॉटेल समोर "खाट आंदोलनाद्वारे चक्का जाम" करण्यात येईल असा इशारा गडचांदूर येथील "मित्रांगण युवा मंच अध्यक्ष हितेश चव्हाण" यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
सदर रस्ता अत्यंत वरदळीचा असून २४ तास याठिकाणी वाहतूक सुरू असते. मात्र सदर काम ठप्प पडून असल्याने नागरिकांना मोठ्याप्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.स्थानिक माणिकगड सिमेंट कंपनीत ये-जा करणारे मोठमोठे वाहन तसेच शहरात जाण्यासाठी नागरिक याच रस्त्याचा वापर करतात.रस्ता खोदून ठेवल्याने धुळीच्या त्रासा सह हल्ली पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.असे असताना संबंधित विभाग निव्वळ बघ्याची भूमिका वठवत असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे. संबंधित कंत्राटदार व संबंधित विभागाने नागरिकांना अक्षरशः वेठीस धरले असून येत्या आठ दिवसांत सदर रस्त्याच्या कामाला वेगाने सुरुवात करून पुर्ण करावे अन्यथा "खाट आंदोलन करून चक्का जाम" करण्यात येईल आणि होणार्या परिणामास शासन जबाबदार राहील असा इशारा "मित्रांगण युवा मंच" अध्यक्ष हितेश चव्हाण यांनी निवेदनातून दिला आहे. जिल्हाधिकारी चंद्रपूर, पालकमंत्री, खासदार, आमदार,तहसीलदार कोरपना,ठाणेदार गडचांदूर, सा. बा.विभाग चंद्रपूर यांना निवेदन पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली असून आता याविषयी काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.