राजुरा: जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरून मारहाणीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील गावांमध्ये अंनिसच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य सुरु असून भविष्यात अनुचित घटना घडू नये यासाठी राजुरा तालुक्यातील विरूर पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या कविठपेठ या गावात जादूटोणाविरोधी कायदा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर चमत्कार भंडाफोड प्रात्यक्षिकांसह जनजागरण सभा घेण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी पोलिस निरीक्षक राहुल चव्हाण होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक अनिल दहागांवकर, जिल्हा सचिव धनंजय तावडे, राजुरा तालुका संघटक धिरज मेश्राम यांची जादूटोना, तंत्र-मंत्र, करणी, भूत-भानामती, देवी अंगात येणे, बुवाबाजी आणि जादूटोणाविरोधी कायदा आदी विषयांवर चमत्कार भंडाफोड प्रात्यक्षिकासह गावकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच खुळचट व अस्तित्वहीन अंधश्रद्धांच्या आहारी न जाता जीवनात चिकित्सक वृत्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन केले. पोलिस निरीक्षक राहुल चव्हाण यांनीही बुवा,बाबा, मांत्रिक, देव्या यांच्या नादी लागून गाव तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था न बिघडवण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमाला गावकऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच, पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांनी परिश्रम घेतले.
