चंद्रपूर प्रतिनिधी/संगीता कार्लेकर
चंद्रपूर दि.30 सप्टेंबर: 1 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय स्वेच्छिक रक्तदान दिन National Voluntary Blood Donation Day म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्ह्यात रक्ताची गरज लक्षात घेता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केलेल्या आवाहनाला औद्योगिक समुहांनी प्रतिसाद देत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यास सुरवात केली आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात विविध ठिकाणी झालेल्या 35 blood donations camp शिबिरातून 1411 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आल्याची माहिती रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे यांनी दिली.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी रक्तदान चळवळीत सहभाग नोंदवून युद्धस्तरावर अनेक उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. याकरीता सर्व औद्योगिक समूहांच्या व्यवस्थापकांसोबत त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठका आयोजित केल्या. जिल्ह्यातील विविध उद्योगसमूहांना रक्तदान चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत औद्योगिक समूहांनी रक्तदान शिबिराचे आयोजन सुरू केले आहे. या रक्तदान शिबिराला जिल्हाधिकारी स्वतः उपस्थित राहून तेथील शिबीर आयोजक व रक्तदात्यांना प्रोत्साहन देत आहे.
तसेच जिल्ह्यामध्ये वर्षभर रक्तदान शिबिराचे आयोजन व्हावे, याकरीता सर्व शासकीय, निमशासकीय विभागाला तसेच राष्ट्रीयकृत बँकाना सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने चंद्रपूर महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. औद्योगिक क्षेत्रात माहे सप्टेंबर महिन्यात 9 उद्योगसमूहांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यात आतापर्यंत एकूण 525 blood doner रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
सप्टेंबर महिन्यात एकूण 35 रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यात एकूण 1411 रक्तपिशव्यांचे रक्तसंकलन करण्यात आले आहे. या रक्तसंकलनामध्ये जिल्ह्यातील सर्व सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सेवाभावी संस्थेने तसेच स्वच्छिक रक्तदात्यांनी सहभाग घेतला. याकरीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितनवरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत व रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे यांचे सहकार्य लाभले आहे.
