चंद्रपूर/नागभीड - चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील वणी खुर्द येथे 8 जणांना जादूटोण्याच्या संशयावरून हात बांधत मारहाण करण्यात आली होती, या घटनेला 2 आठवडे होत नाहीतर पुन्हा नागभीड येथील मिंडाला या गावात अश्याच घटनेची पुनरावृत्ती झाली.
जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेसह 2 मुलांना पाण्याच्या टाकीला दोर बांधत एकाच कुटुंबातील सदस्यांनी मारहाण केली.
सदर घटना बुधवारी उजेडात आली असून नागभीड पोलिसांनी या प्रकरणात 5 जणांना अटक केली आहे. Suspicion of witchcraft
मिंडाळा येथील इंदिरा उपासराव कामठे (७०) हिचा मुलगा अशोक कामठे हा जादूटोणा करतो. घरातून नेहमीच जादूटोण्याद्वारे पैसे गायब करतो, असा आरोपींचा संशय होता. या संशयातूनच मंगळवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास अशोकच्या आई व बहिणीला मारहाण करण्यात आली.
यावेळी अशोक नागभीड येथे होता. आरोपींनी नागभीड गाठून अशोकला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून मिंडाळाला आणले. यानंतर त्याला गावातील पाण्याच्या टाकीच्या लोखंडी अँगलला दोराने बांधून जबर मारहाण केली.
बुधवारी सकाळीच अशोकच्या आईने नागभीड पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. अशोक मारहाणीपासून घरी नसल्याचे समजते.
या तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी प्रमोद सडमाके, सीताराम सडमाके, मयुरी सडमाके सर्व रा. मिंडाळा आणि मयुरीची आई, रा. कानपा या सर्वांना १४३, १४७, १४९, ४५२, ३२४, ३४२, ३६३, ३६८, ३२३ सहकलम ३ (१), (२) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी भेट दिली आहे. सध्या गावात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.