कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे.शासनाने लग्न,सभा, बैठका,सामुहिक समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमांना कोविड संबंधी नियमांचे पालन करण्याच्या अटींवर परवानगी दिली आहे.असे असताना गडचांदूर शहरात चौकाचौकात नागरिकांची मोठ्याप्रमाणात "कोरोना" चाचणी केली जात होती मात्र सध्या या मोहीमेला ब्रेक लागल्याचे दिसत आहे.यामुळे शहरात कोविड संबंधी शासन नियमांची पायमल्ली होताना दिसत असून हे चित्र पाहून गडचांदूरकरांना कोरोनाचा विसर पडला की काय ! अशी शंका निर्माण झाली आहे.
शहरातील मोठमोठ्या दुकानदारांना कोविड टेस्टची सक्ती करण्यात आल्याने जवळपास सर्वांनीच ही प्रक्रिया पूर्ण केल्याचे दिसते.मात्र शहरात विविध ठिकाणी फुटपाथवरील भाजी,फळ विक्रेते,हॉटेल,चहा टपरी,पानठेले चालक व त्याठिकाणच्या कामगारांची "कोरोना" चाचणी करणे गरजेचे आहे.कारण इतरांपेक्षा यांचा नागरिकांशी थेट व जास्त संपर्क येतो.यांच्यातील जर एखादं कोरोना संक्रमित असेल तर दुसर्याला बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अशा परिस्थिती यांची "आरटीपीसीआर व एन्टीजेन" टेस्ट होणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
एकीकडे शासनप्रशासन सतत आवाहन करीत आहे की "मास्क लावा,सोशल डिस्टंसिंग ठेवा" तर दुसरीकडे याठिकाणी नागरिक बेफिकीरीने वावरताना दिसत आहे.कित्येक लहानमोठे दुकानदार कोविड नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करताना दिसत असून काही अपवाद वगळता मास्क व सोशल डिस्टंसिंगची अक्षरशः वाट लावली जात असल्याचे पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत कोरोना पसरण्याची शक्यता बळावली असून संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे.विशेष महीम राबवून शहरातील फुटपाथवरील त्या सर्व दुकानदारांची आरटीपीसीआर व एन्टिजेन टेस्ट करावी, विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.आता संबंधित विभाग याला किती गंभीरतेने घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.