प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर. ता.३०:- जुन्या वैमनस्यातुन दोन गटात झालेल्या हाणामारीत तलवार हल्यात राहुल डंगोरे वय-४१ वर्ष हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. हि घटना रविवार दि.२९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. घटनेनंतर हल्यातील तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
अधून-मधून शहरात खून, हाणामारी यासारख्या घटना घडण्याचे सत्र सुरूच आहेत. या वाढत्या घटनांना आडा घालण्याचा प्रयत्न स्थानिक पोलीस करीत आहेत. मात्र, त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे शहरात सतत घडणाऱ्या घटनांमुळे दिसून येत आहेत. परिणामी, शहरात विविध चर्चेला उत येत आहेत.
अशीच एक गॅंगवारीची घटना जुन्या वैमनस्यातुन काल दि.२९ रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली आहे. घटनेतील जखमी राहुल डंगोरे आणि अजय झांझोटे यांच्यात जुना वाद होता. अश्यातच काल दुपारच्या सुमारास चेतन बियर बार येथे बाचाबाचीतून दोघांमध्ये पुन्हा जुना वाद उफाळून आला. अश्यातच सायंकाळच्या ६ वाजताच्या सुमारास राहुल डंगोरे एकटा दिसल्याने त्याच्यावर अजय झांझोटे वय-२७, शिवशंभू झांझोटे वय- २५, रा.कन्नमवार वार्ड, आणि राहुल बिडकट वय-२३ रा- पंडित दीनदयाळ वार्ड या तिघांनी मिळून राहुल डंगोरे वर तलवारीने वार केले. या हल्यात राहुल डंगोरे जखमी असून, त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत. घटनेनंतर हल्यातील तीनही आरोपींना अटक करण्यात आली असून, घटनेचा तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेझ मुलाणी करीत आहे.
