कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
परिश्रम आणि जिद्द असेल तर अशक्य काहीच नसते.याचे जिवंत उदाहरण एका मराठी मुलीने आपल्या खेड्यापासून तब्बल दीड हजार किलोमीटर अंतरावरील "केरळ" मध्ये बारावीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण मिळवून महाराष्ट्रचे नाव लौकिक केले आहे.आदिवासी बहूल कोरपना तालुक्यातील बोरी नवेगाव या छोट्याशा खेड्यातील तुरीया शंकर तडस असे सदर मुलीचे नाव असून ती मागील ६ वर्षांपासून केरळ येथे शिक्षण घेत आहे.
केरळचे शिक्षण उत्तम असते असे बोलले जात असून तेथे वसतिगृहाची व्यवस्था असल्यामुळे तुरीयाने इयत्ता ७ वी पासून तिथे शिक्षण घेण्याचे आव्हान स्वीकारले. देशातील सर्वांत कठीण समजली जाणारी केरळची मल्याळम भाषा अवगत करणे म्हणजे मोठे आव्हानच. तेथील संस्कृती,आहार आणि वातावरण अगदीच भिन्न असल्याने सुरुवातीचे दिवस थोडे कठीणच गेले.नंतर ६ वर्ष कसे गेले कळलेच नाही.थ्रिसूर जिल्ह्याच्या ठिकाणी "सारदा मठाच्या" वतीने १०० मुलींचे वसतीगृह आणि शाळा चालविली जाते.अशी माहिती इंटरनेटवरून मिळाली मात्र प्रवेश मिळेल की नाही ? हा मुख्य प्रश्न होता.
चंद्रपूर येथील सुरेश पोनोली हे मूळ केरळचे असल्याने त्यांच्या सहकार्याने शाळेत प्रवेश झाला होता. सारदा मठ हा संन्यासी महिला चालवितात. त्यामुळे साहजिकच एक पवित्र वातावरण या शाळेला लाभले आहे.कडक शिस्त येथील विशेष बाब असून सर्व नियम कठोरपणे पाळावेच लागतात. त्यामुळे येथील मुली नेहमीच अभ्यासात पुढे असतात अशी ख्याती आहे. तुरीया तडस या मुलीने कोरपना तालुक्याचे नाव लौकीक केल्याबद्दल हिच्यावर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

