कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
औद्योगिक शहराच्या नावाने जगप्रसिद्ध कोरपना तालुक्यातील मोठे व नावाजलेले गडचांदूर,हे दोन तालुक्याच्या मध्यभागी व जास्त लोकसंख्येचे शहर असून याठिकाणी मोठी बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय, शासकीय, निमशासकीय कार्यालय,बँका असल्याने विविध कामानिमित्त मोठ्यासंख्यने नागरिक येथे येतात. परंतू या नावाजलेल्या शहरात सुसज्ज असे बसस्थानक नसल्याने हे शहर "बसस्थानक विना पोरके!" म्हटले तर वावगे ठरणार नाही. सुसज्ज बसस्थानकचा मुद्दा ऐरणीवर असताना याकडे दुर्लक्ष केला जात आहे.बसस्थानक विषयी काहीच हालचाली दिसत नसताना याठिकाणी आधुनिक पद्धतीचे प्रवासी निवारे उभारून केवळ तोंडाला पाने पुसली गेली आहे.बसस्थानक अभावी नागरिकांना होणाऱ्या त्रासाने परिसीमा गाठली असून यांच्यावर तीनही ऋतूत बसच्या प्रतिक्षेत इकडे-तिकडे उभे राहण्याची नामुष्की ओढावली आहे. लहानमोठे विद्यार्थी,वयोवृद्ध नागरिक विशेषतः चिमुकल्या बाळांची माता यांना मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
गडचांदूर शहर हे दोन तालुक्यातील सेंटर पाईंट असून याठिकाणी ये-जा करणाऱ्यांची गर्दी पाहता येथे मोठे,सर्व सुविधायुक्त असे बसस्थानक होणे गरजेचे आहे.मात्र हे स्वप्न केव्हा साकार होईल सांगणेही कठीण होऊन बसले आहे.एअरपोर्टला ही लाजवेल अशा हायटेक बसस्थानकांची निर्मिती जिल्ह्यात झाली.आणि येथे केवळ प्रवासी निवारे उभारून पाठ थोपटली जात आहे.बसस्थानक अभावी लोकांना नाईलाजास्तव प्रसाधनगृहापुढे बसून बसची वाट पहावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे.जून्यांनी आश्वासन देत देत दिवस काढले.आता यांनी तरी बसस्थानकचा मुद्दा अग्रस्थानी ठेवून याविषयी पावले उचलून लोकांना होणारा त्रास दूर करायला हवा,मात्र अजूनही असे झालेले नाही.यामुळे यंदाही सुसज्ज बसस्थानकाचे सुख मिळण्याची शक्यता कमीच दिसत असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
--------------//---------
उद्ध्वस्त प्रवासी निवाऱ्यांमुळे क्षणांच्या विश्रांतीसाठी जागाच सापडेना
बसच्या प्रतिक्षेत असलेले खेड्यापाड्यातील प्रवाशांना क्षणभर विश्रांती मिळावी यासाठी प्रवासी निवारे उभारले जातात.मात्र ज्याठिकाणी हे नसेल तर तेथील लोकांना कशाप्रकारे त्रास सहन करावा लागत असेल याची कल्पनाही करवेना. अशीच परिस्थिती सध्या कोरपना तालुक्यात पहायला मिळत आहे. जर राजूरा पासून कोरपना तालुक्यातील शेवटच्या टोकापर्यंत पाहणी केली तर कित्येक प्रवासी निवारे उध्वस्त झाले,कित्येकांचे छप्पर गायब आहे,काहींना कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले तर काही अक्षरशः नामशेष झाल्याचे पहायला मिळेल. याक्षेत्रात अशी परिस्थिती आहे तर संपूर्ण राजूरा विधानसभा क्षेत्रात काय असेल याची कल्पनाच न केलेली बरी.
प्रवासी निवारे नसल्याने लोकांना पावसाळ्यात पाणी,उन्हाळ्याच्या रणरणत्या उन्हात उभे राहून बसची वाट पहावी लागते.बसस्थानक व प्रवासी निवारे हे जनतेच्या इतर मुलभूत सुविधांपैकी एक असून याला अग्रक्रमांक देण्याऐवजी इतर कामांचे सोहळे साजरे केले जात असल्याची जळजळीत भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधी अनेकदा यामार्गाने ये-जा करतात. त्यांना हे दिसत नसेल का ? हे मात्र न उलगडणारे कोडेच बनले आहे.आतातरी याकडे लक्ष देऊन ही मुलभूत समस्या मार्गी लावावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
