चंद्रपूर - कोविड काळात अनेकांनी बेड, ऑक्सिजन अभावी जीव गमावला मात्र त्यावेळी ह्या नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी चंद्रपूर मनपा अयशस्वी ठरली.
कोरोना सारख्या महामारीत सुद्धा चंद्रपूर मनपाने महापौर यांच्यासाठी तब्बल 11 लाखांचे चारचाकी वाहन घेतले, इतकेच नव्हे तर त्या वाहनांसाठी अतिविशिष्ट क्रमांकासाठी 70 हजार रुपये मोजले. जनतेच्या करातून मिळालेल्या पैश्यांची चंद्रपूर मनपा कशी उधळपट्टी करत आहे ते यामधून उघडकीस आले.
जनतेच्या पैश्यांची उधळपट्टी व पालिकेच्या भ्रष्टाचारविरोधात चंद्रपूर आम आदमी पक्षाने रणशिंग फुकत, पालिकेसमोर "पुंगी बजाव" आंदोलन केले.
जनतेच्या पैश्यांचा अपव्यय करून पालिका महापौर राखी कंचर्लावार यांनी वाहनांच्या व्हीआयपी क्रमांकपोटी पैश्यांची उधळण केली, त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा देत जनतेचे पैसे परत करावे अशी मागणी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी केली.
भाजपची सत्ता असलेली महानगरपालिका वारंवार कोणत्या न कोणत्या भ्रष्टाचारात अडकत आहे, यावर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी डोळेझाक करू नये असा सल्ला सुद्धा मुसळे यांनी यावेळी दिला.
पुंगी बजाव आंदोलनात मयूर राईकवार, राजेश विराणी, योगेश आपटे, राजू कुडे, हिमायू अली आदी उपस्थित होते.