कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथे महिला बचतगट सचिव व बँक सखी यांनी संगनमत करून एका बचतगटाची २ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे.फसवणूक झालेल्या बचतगटाच्या महिलांनी ठाणेदार कोरपना,तहसीलदार कोरपना,बँक व्यवस्थापक कोरपना,प्रकल्प समन्वयक, उमेद पंचायत समिती कोरपना यांच्याकडे लेखी तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.
सविस्तर असे की,कन्हळगाव येथील "सखी महिला बचतगटाच्या सदस्यांनी यावर्षी नवीन कर्ज मिळावे म्हणून मागील वर्षी घेतलेल्या लोनचे २ लाख रुपये गटाच्या सचिवकडे दीले. तिने रक्कम बँकेत भरल्याचे सांगितले.असे असताना बँकेशी कोणतेही संबंध नसलेली बँक सखीने सदर गटाच्या महिलांना सांगितले की,आता पुन्हा नवीन लोन घेण्यासाठी नवीन फाईल उघडावी लागेल म्हणून फाईल तयार केली व विड्रालवर सह्या घेतल्या आणि तुम्हाला पैसे मिळणार असल्याचे सांगत गटाकडून नगदीस्वरूपात १३ शे रुपये घेतले. व तुमचे पैसे मिळाले म्हणून सौ.उईके यांच्या पिशवीत दाखविले आणि तुम्ही वाटून घ्या असे सांगितले.आम्ही सचिवांच्या घरी गेलो असता "आज वाटतो,उद्या वाटतो" अशाप्रकारे ८ ते १० दिवसांपासून वारंवर बनवाबनवीची उत्तरे मिळत असल्याची बाब सदर गटातील महिलांनी निवेदनात नमूद केली आहे.
याविषयी शहानिशा करण्यासाठी सदर बचतगटांच्या महिलांनी "कोकण ग्रामीण बँक" कोरपना मॅनेजर सोबत संपर्क साधला असता "तुमच्या मागील वर्षीचा लोन,दोन लाख रुपये भरले नसून तुम्हाला नवीन लोन कसे काय मिळणार" असे मॅनेजर यांनी सांगीतले.हे ऐकुण महिलांच्या पायाखालची वाळूच घसरली.आपण फसविल्या गेलो असे लक्षात आल्याने सदर गटाच्या महिलांनी १६ जुलै रोजी संबंधितांना निवेदन दिले.बचतगट सचिव व बँक सखी यांनी संगनमत करून पैसे हडपल्याचा आरोप करत गटाचे पैसे हडपणाऱ्या दोन्ही महिलांवर कडक कारवाई करावी,आमची रक्कम आम्हाला परत मिळवून द्यावी अशी मागणी सखी महिला बचतगटच्या अध्यक्षा सौ.अनीता केराम,सदस्य सौ.शिल्पा वाघाडे,सौ.संगीता वाघाडे,सौ.मेघा वाघाडे,श्रीमती शारदा हंसकर,सौ.माया खंडाळकर, सौ.रंजना वाघाडे,सौ.विमलबाई मडावी, सौ.मंगला पारखी यांनी निवेदनातून केली आहे.आता या महिलांना न्या मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
