पोम्भूर्णा: चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील जामखुर्द हे छोटंसं गाव. याच गावात मागील 17 वर्षांपासून एक नवल घडतंय. गुरुदास आणि सुनीता मडावी यांचा हा भुजंग नावाचा मुलगा. मुलगा दिव्यांग आहे. जन्माला आल्यापासून त्यानं अन्नाचा एक कणसुद्धा खाल्लेला नाही. आज तो सतरा वर्षांचा आहे. पण कधी बिस्कीट नाही, चॉकलेट नाही की भात-वरण नाही. तो यातलं काहीही खात नाही. तो जगतोय केवळ दुधावर. सकाळ-संध्याकाळ पावशेर दुधावर तो आपला दिवस काढतोय. आई-वडील मोलमजुरी करतात. हातावर आणून पानावर खाणारं हे गरीब कुटुंब. त्यामुळं पैशांची सतत चणचण. अशात कधी दूध घ्यायला पैसे नसले, तर भुजंग उपाशीच झोपतो. त्याचं हे उपाशी झोपणं मातापित्यालाही अस्वस्थ करणारं. पण परिस्थितीच अशी असल्यावर त्यांचा नाईलाज आहे. शारीरिक उणिवा असल्या तरी भुजंग प्रकृतीनं निरोगी आहे. त्याला लिहिता-वाचता येत नाही. पण तरीही त्याला जवळच्या देवाडा येथील शाळेत दाखल केलं. आता तो दहावीत आहे. वाचता-लिहिता येत नसलं तरी बोललेलं त्याला सगळं कळतं. वहीवर केवळ आडव्या-उभ्या रेषा तो काढत असतो. या रेषांमध्येच त्याचं आयुष्य आता गुंतलं. त्याच्यातील ही दिव्यांगता आई-वडीलास अस्वस्थ करीत असते. आपल्यानंतर त्याला कोण सांभाळणार, त्याचं पुढं काय होईल, याची चिंता पालकांना सतत त्रस्त करते. त्यामुळं शासनानं त्याच्यासाठी काही करावं, अशी मागणी या पालकांनी केलीय.
या मुलाचा जन्म झाल्यानंतर तेराव्या दिवशी त्यानं डोळे उघडले. त्याच्या जन्मापासून ते आतापर्यंत सारं काही असामान्य. हे असामान्यपण येण्याला वेगळी वैद्यकीय कारणं आहेत. पण आता त्याला सकस आहार देण्याची गरज आहे. दुधातून जगण्यासाठी लागणारे घटक त्याला मिळत असले, तरी ते पुरेसे नाहीत. त्यामुळं त्याची वाढ होईल, पण सुदृढता येणार नाही, असं डॉक्टरांचं मत आहे.
भुजंग अन्न न खाता जगतोय, हे जगासाठी नवल असलं तरी अशा मुलांच्या पालकांचं जगणं असह्य असतं. त्यामुळं केवळ बातमी म्हणून अशा घटनांकडे न बघता मदतीचा हात पुढे करून समाजानं या कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे.

