कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील पिपर्डागुडा येथे विषारी औषध मिश्रित धान्य खाल्ल्याने १४ कोंबड्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे.सदर घटना १४ जुलै रोजीची असून कोंबड्या मालकाच्या तक्रारी वरून कोरपना पोलीसांनी शेजारच्या शेतकऱ्याविरूद्ध कलम ४२९ आयपीसी अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.
सदर घटने प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार पिपर्डागुडा येथील महेंद्र कुळमेथे, लच्चू कुळमेथे,बाजीराव पंधरे यांच्याकडे पाळलेल्या ३५ कोंबड्या आहे. घटनेच्या दिवशी सकाळी अंदाजे ६ च्या सुमारास त्यांनी कोंबड्यांना चरण्यासाठी सोडले.दिवसभर चरून सायंकाळी ५ च्या सुमारास गावा लगत शेजारचे पिंपळकर यांच्या शेतातून येत असताना त्या अचानकपणे चक्कर येऊन पडत होत्या.यात १४ कोंबड्या मरण पावल्याने अंदाजे १५ हजारांचे नुकसान झाले असून शेतमालक पिंपळकर यांनीच कोणते तरी विषारी औषध टाकून कोंबड्या मारल्याची तक्रार करण्यात आल्यामुळे पिंपळकर विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे.