प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल - मूल तालुक्यातील केळझर मार्गावरील पिंपलझोरा येथील कक्ष क्रमांक 428 वनरक्षक मोरे हे सहकाऱ्यांसह गस्त करीत असताना मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आली त्यांनी त्या दिशेने गेले असता 2 मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले.
सदर मृतदेह हे महिला व पुरुषाचे असल्याचे त्यांना समजले, व याबाबत पोलिसांना कळविण्यात आले.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.
घटनास्थळी तपास केला असता त्यांना मृतदेहापासून काही अंतरावर एक दुचाकी वाहन आढळले, दुचाकी क्रमांक एमएच 34 एजे 5880 पोलिसांनी ताब्यात घेतली, दुचाकीच्या कागदपत्रांवरून पोलिसांनी मूळ मालकाचा शोध लावला, मात्र ती दुचाकी त्याने विकली अशी माहिती दिली.
सदर दुचाकी ही 10 दिवसापासून जंगलात उभी होती, ती दुचाकी मृतकाची असल्याचा पोलिसांना संशय आला.
मृतकाच्या खिशात सापडलेल्या कागदपत्रांवरून मृतकांची ओळख पटली सदर मृतदेह हा आष्टी येथील रहिवासी राजू होमदेव आत्राम यांचा असल्याची खात्री पटताच, पोलिसांनी राजू यांच्या कुटुंबांना याबाबत माहिती दिली.
कुटुंबातील सदस्यांनी मृतदेह राजू व सलोनी मडावी यांचा असल्याची माहिती दिली.
याबाबत पोलिसांनी अधिक तपास केला असता 22 वर्षीय राजू व 18 वर्षीय सलोनी यांचं एकमेकांवर प्रेम होते, त्या दोघांनी आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या मात्र कुटुंबाचा विरोध असल्याने ते दोघेही खचले होते.
घटनेच्या 10 दिवसआधी दोघेही सोबत घरून निघाले व केळझर येथील जंगलात गेले, त्या दोघांनी गळफास घेत आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी लावला आहे.
शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
प्रकरणाचा तपास ठाणेदार सतिशसिंह राजपुत यांचे मार्गदर्शनात सपोनी मनोज गदादे आणि पोहेकाॅं अकबर पठाण करीत आहेत.

